01 March 2021

News Flash

पूरग्रस्त आरतीच्या कुटुंबाला मॅरेथॉनमधील यशाचा आधार!

घरावर दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर आता मॅरेथॉन शर्यतींमधून मिळणारी कमाई पाटील कुटुंबीयांसाठी लाखमोलाची ठरत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तुषार वैती

काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. घरदार, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक जण या धक्क्यातून अजूनही सावरू शकले नाहीत. गडहिंग्लज तालुक्यातील कडगांवमध्ये राहणाऱ्या आरती पाटीलच्या कुटुंबावरसुद्धा ही परिस्थिती ओढवली. भातशेती, हरभरा, भुईमुगाचे पीक पुरात वाहून गेल्यानंतर घरातल्या कमावत्या एकमेव वडिलांना सर्पदंशाने दुखापत झाली. घरावर दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर आता मॅरेथॉन शर्यतींमधून मिळणारी कमाई पाटील कुटुंबीयांसाठी लाखमोलाची ठरत आहे.

‘‘अतिवृष्टीनंतर गडहिंग्लज नदीला पूर आल्याने कोल्हापुरातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. दोन-तीन दिवस कुणाशीही संपर्क होत नव्हता. मी नाशिकमध्ये असल्याने घरच्यांशी बोलणे होत नसल्यामुळे जिवाची घालमेल सुरू होती. मनात वेगवेगळे विचार सुरू होते. पण दोन-तीन दिवसांनंतर सैन्यदलातील माझा भाऊ जेव्हा घरी पोहोचला, तेव्हा घरचे सर्व सुखरूप असल्याचे कळल्यानंतर जीव भांडय़ात पडला. पण शेतीचे प्रचंड नुकसान झाले होते. आता वर्षभर करायचे काय, हा प्रश्न सतावत होता. अखेर गेल्या तीन मॅरेथॉन शर्यतीतून मिळालेल्या बक्षीस रकमेचा आधार आम्हाला मिळत आहे,’’ असे सांगताना मुंबई मॅरेथॉनमध्ये महिलांच्या अर्धमॅरेथॉन प्रकारात दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या आरती पाटीलचे डोळे काहीसे पाणावले होते.

‘‘कठीण परिस्थितीत घरच्यांना माझ्या आधाराची गरज असताना वडिलांनीच मला धीर देत नाशिकमध्येच थांबून सरावावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. पण दिवाळीत सुट्टीच्या वेळी मी घरी पोहोचले, तेव्हा त्या भीषण परिस्थितीची कल्पना आली. घर पाण्याखाली असतानाही घरातल्यांनी घरातील अन्नधान्य इतरांना देऊन मदतीचा हात पुढे केला होता. त्यानंतर शेतात काम करत असतानाच वडिलांना सर्पदंश झाला. तीन महिन्यांच्या उपचारानंतरही हाताच्या एका बोटाची सूज उतरलेली नाही. मुंबईत उपचार घेताना बराच खर्च येत आहे. त्यामुळे ठाणे मॅरेथॉन, हिरानंदानी मॅरेथॉननंतर आता मुंबई मॅरेथॉनमध्ये मिळालेल्या बक्षीस रकमेचा आधार मिळत आहे,’’ असे नाशिकच्या एकलव्य अकादमीत विजेंद्र सिंग आणि माजी ऑलिम्पिकपटू कविता राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या आरतीने सांगितले.

‘‘वयाच्या पाचव्या वर्षांपासून धावायला सुरुवात केल्यानंतर अनेक राष्ट्रीय पदकांवर नाव कोरले. त्यातच विजेंद्र सरांनी मला नाशिकला सरावाला येण्याचे निमंत्रण दिले होते. कोल्हापूरमधील प्रशिक्षकांची तसेच आधुनिक सोयीसुविधांची वानवा आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये यश मिळवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून मी बारावीत असताना नाशिक गाठले. २०१६मध्ये बहारिन येथे आशियाई क्रॉस कंट्री, २०१९मध्ये इटलीतील जागतिक विद्यापीठ स्पर्धा तसेच डिसेंबर महिन्यात दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून यश संपादन केल्यानंतर आता आणखीन आंतरराष्ट्रीय पदके मिळवण्याचा माझा निर्धार आहे,’’ असे मुंबई प्राप्तिकर विभागात सेवेत असलेल्या आरतीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:24 am

Web Title: foundation of success in the marathon for a flooded aarti family abn 97
Next Stories
1 दुखापतीवर मात करत मोनिका आथरेची गरुडझेप!
2 ‘एफआयएच’ प्रो लीग हॉकी : भारताचा नेदरलँड्सवर रोमहर्षक विजय
3 खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जलतरणात महाराष्ट्राला चार सुवर्ण
Just Now!
X