News Flash

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा : सोलापूरचा ‘सुवर्णचौकार’

माती विभागात ८६ किलो गटात प्रशांत जगतापने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला ८-२ असा पराभव केला

महाराष्ट्र केसरी

‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत रविवारी सोलापूरच्या मल्लांनी ‘सुवर्णचौकार’ लगावला. कालिचरण सोलनकर (७० किलो-गादी), वेताळ शेळके (८६ किलो-गादी), शुभम चव्हाण (९२ किलो-माती) आणि प्रशांत जगतापने (८६ किलो-माती) या सोलापूरच्या कुस्तीपटूंनी जेतेपद मिळवले.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत गादी विभागातील ७० किलो वजनी गटात अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्य़ाच्या कालिचरणने पुणे जिल्ह्य़ाच्या दिनेश मोकाशीवर ११-५ गुणांनी सहज विजय मिळवत जेतेपद प्राप्त केले. अहमदनगरच्या विकास गोरेने लातूर जिल्ह्याच्या अलिम शेखवर १५-३ असा सहज विजय मिळवत कांस्यपदक जिंकले. याच गटाच्या कांस्यपदकाच्या दुसऱ्या लढतीत पिंपरी-चिंचवडच्या योगेश्वर तापकिरने औरंगाबादच्या कृष्णा गवळीवर १०-० अशा तांत्रिक गुणाधिक्याने विजय मिळवला.

८६ किलो गटाच्या अंतिम सामन्यात सोलापूर जिल्ह्य़ाच्या वेताळ शेळकेने जालन्याच्या बाबासाहेब चव्हाणवर ८-० असा विजय मिळवला. धुळ्याच्या हर्षल गवते व रमेश कुकडे यांनी कांस्यपदक पटकावले.

माती विभागात ८६ किलो गटात प्रशांत जगतापने अहमदनगरच्या आकाश भिंगारेला ८-२ असा पराभव केला. प्रशांत हा वयाच्या २२व्या वर्षी प्रथमच ‘महाराष्ट्र केसरी’ वजनी गट स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याने सुवर्णपदकावर मोहोर उमटवली. सोलापूर जिल्ह्य़ातील कुंभारगाव येथील हा पहिलवान वस्ताद अमृत मामा भोसले यांच्या तालमीत तयार झाला आहे. पुण्याच्या संतोष पडळकरने सांगलीच्या रणजीत पवारला १०-० असे नमवून कांस्यपदक पटकावले.

७० किलो वजनी गटात कोल्हापूर शहरचा पहिलवान नितीन पवार व कोल्हापूर जिल्ह्य़ातील मच्छिंद्र निवंगरे यांच्यात अत्यंत चुरशीची व अटीतटीची लढत झाली. दोघांनीही ४-४ गुण मिळवले. मात्र नियमांनुसार निर्धारित वेळेतील अंतिम गुण हा नितीनने पटकावल्याने त्याला विजेता घोषित करण्यात आले आणि तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. नितीन पवारने यापूर्वी २०१७च्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. वजनी गटातील ही त्याची पाचवी स्पर्धा असून वस्ताद कृष्णा पाटील यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे, तर सोलापूर जिल्ह्य़ातील संतोष गावडेने उस्मानाबादच्या लक्ष्मण जाधवला २-१ अशा फरकाने हरवत कांस्यपदक जिंकले.

९२ किलो अंतिम लढतीत सोलापूर जिल्ह्य़ाच्या शुभम चव्हाणने साताऱ्याच्या जयदीप गायकवाडवर ८-० अशी मात केली. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत बीडच्या अमोल मुंडेने लातूरच्या प्रदीप काळेला चितपट केले.

अंतिम निकाल

माती विभाग –

७० किलो : १. नितीन पवार (कोल्हापूर शहर), २. मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा), ३. संतोष गावडे (सोलापूर); ८६ किलो : १. प्रशांत जगताप (सोलापूर), २. आकाश भिंगारे (अहमदनगर), ३. संतोष पडळकर (पुणे); ९२ किलो : १. शुभम चव्हाण (सोलापूर जि.), २. जयदीप गायकवाड (सातारा), ३. अमोल मुंडे (बीड).

गादी विभाग –

७० किलो : १. कालिचरण सोलनकर (सोलापूर जि.), २. दिनेश मोकाशी (पुणे जि.), ३. विकास गोरे (अहमदनगर), ३. योगेश्वर तापकिर (पिंपरी-चिंचवड); ८६ किलो : १. वेताळ शेळके (सोलापूर जि.), २. बाबासाहेब चव्हाण (जालना), ३. हर्षल गवते (धुळे), ३. रमेश कुकडे (नाशिक जिल्हा).

अभिजीतची आगेकूच

महाराष्ट्र केसरी खुल्या गटाच्या गादी विभागातील तिसऱ्या फेरीत पुणे शहराच्या अभिजीत कटकेला सोलापूरच्या योगेश पवारने अतीतटीची झुंज दिली. या वेळी ६-० गुणांनी अभिजीतने विजय मिळवत पुढच्या फेरीत घोडदौड सुरू ठेवली. मुंबई उपनगरच्या सचिन येलभरने कोल्हापूर शहराच्या समीर देसाईचा ५-२ असा पराभव केला. नाशिक जिल्ह्य़ाच्या हर्षवर्धन सदगिरने मुंबई उपनगरच्या संतोष गायकवाडला ५-२ असे हरवले. पुणे जिल्ह्य़ाच्या आदर्श गुंडने सहजपणे रायगडच्या कुलदीप पाटीलवर तांत्रिक गुणाधिक्याने सहज विजय मिळविला. माती विभागातील तिसऱ्या फेरीत मुंबई पूर्वच्या संदीप काळेने नाशिक जिल्ह्य़ाच्या पोपट घोडकेवर तर सोलापूरच्या ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जमदाडेने सोलापूर शहरच्या धीरज सरवदेवर चितपट विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 1:24 am

Web Title: four golds to the wrestler of solapur abn 97
Next Stories
1 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची सेनादलापुढे शरणागती!
2 लबूशेनचे भवितव्य उज्ज्वल!
3 ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
Just Now!
X