स्मिथ, व्होग्ससह चार फलंदाजांची शतके

ऑस्ट्रेलियाचा ३ बाद ५५१ धावांचा डोंगर

विंडीजचा पहिला डाव गडगडला

जो बर्न्‍स आणि उस्मान ख्वाजाचा कित्ता गिरवत कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अ‍ॅडम व्होग्स यांनी शानदार शतके झळकावली. त्यामुळे मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर जणू ऑस्ट्रेलियाने ‘शतकांच्या फॅक्टरी’ची अनुभूती दिली. दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशीच दुबळ्या वेस्ट इंडिजवर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

यंदाचे वर्ष सातत्यपूर्ण कामगिरीनिशी गाजवणाऱ्या स्मिथने वर्षांतील सहावे व कारकीर्दीतील १३वे शतक नोंदवताना नाबाद १३४ धावा केल्या. व्होग्सने नाबाद १०६ धावांची खेळी साकारली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी २२३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. स्मिथने ३ बाद ५५१ धावसंख्येचा डोंगर उभारून संघाचा डाव घोषित केला. प्रत्युत्तर देताना वेस्ट इंडिजचा डाव मात्र ६ बाद ९१ असा गडगडला. सामन्याचे तीन दिवस शिल्लक असून, विंडीजचा संघ अद्याप पहिल्या डावातील धावसंख्येच्या ४६० धावांनी पिछाडीवर आहे. खेळ थांबला, तेव्हा होबार्टचा शतकवीर डॅरेन ब्राव्हो व पदार्पणवीर कार्लोस ब्रेथवेट अनुक्रमे १३ आणि ३ धावांवर खेळत होते.

स्मिथच्या खात्यावर २०१५मध्ये सर्वाधिक १४०४ धावा झाल्या आहेत. इंग्लंडच्या अ‍ॅलिस्टर कुकला (१३५७ धावा) त्याने रविवारी मागे टाकले.

व्होग्सने (१०२८ धावा) कारकीर्दीतील पहिल्याच वर्षांत १८व्या कसोटी सामन्यात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला. पदार्पणाच्या वर्षांत हजार धावांचा टप्पा याआधी फक्त ऑस्ट्रेलियाचा मार्क टेलर व कुक यांना ओलांडता आला आहे. होबार्टला नाबाद २६९ धावा काढणारा व्होग्स या मालिकेत अद्याप बाद झालेला नाही. ३६ वर्षीय व्होग्सला ५६ धावांवर असताना कार्लोस ब्रेथवेटच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये डॅरेन ब्राव्होने जीवदान दिले.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजा (१४४)  व जो बर्न्‍सने (१२८) यांनी शतके नोंदवली.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १३५ षटकांत ३ बाद ५५१ डाव घोषित (जो बर्न्‍स १२८, उस्मान ख्वाजा १४४, स्टीव्ह स्मिथ नाबाद १३४, अ‍ॅडम व्होग्स नाबाद १०६; जेरॉम टेलर २/९७)

वेस्ट इंडिज (पहिला डाव) : ४३ षटकांत ६ बाद ९१ (जेर्मेनी ब्लॅकवूड २८, राजेंद्र चंद्रिका २५; नॅथन लिऑन २/१८, पीटर सिडल २/१९, जेम्स पॅटिन्सन २/३६)