टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच व्हावी, ही एकच प्रार्थना मी करीत आहे. करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ऑलिम्पिक स्पर्धा रद्द झाल्यास पदक जिंकण्याच्या दृष्टीने केलेली सर्व मेहनत वाया जाईल, अशी भावनिक प्रतिक्रिया वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानूने व्यक्त केली.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. मात्र करोनामुळे ते लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. याबाबत मीराबाई म्हणाली, ‘‘ऑलिम्पिक स्पर्धा झाली नाही, तर ऑलिम्पिक पदक मिळवण्याच्या जिद्दीने गेली चार वर्षे घेतलेली मेहनत वाया जाईल. त्यामुळे स्पर्धा रद्द होऊ नये, हीच माझी इच्छा आहे.’’

मीराबाईचे ऑलिम्पिक पदार्पण निराशाजनक ठरले होते. कारण क्लीन आणि जर्क प्रकारातील तिचे तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले होते. ऑलिम्पिक पात्रता वेटलिफ्टिंग स्पर्धानाही त्याचा मोठा फटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाने आशिया खंडासहित पाच खंडांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धा रद्द केल्या आहेत.

‘‘मी आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी उत्तम तयारी केली होती. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मी पात्र ठरली असतानाही आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कामगिरीचा आढावा घेण्याची संधी होती. पण ती वाया गेली. आता टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धा पुढे जरी ढकलली तरी बऱ्याच समस्या होतील. कारण नंतर अत्यंत कमी वेळेत स्पर्धेची तयारी करावी लागेल,’’ असे २५ वर्षीय मीराबाईने सांगितले.