डीडीसीएचे उपाध्यक्ष चेतन चौहान यांना विश्वास

दिल्ली उच्च न्यायालयाने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा कसोटी सामना आयोजित करण्यासाठी फिरोझशाह कोटला मैदानाला परवानगी दिली आहे. त्यानंतर आता ही कसोटी आम्ही यशस्वी करून दाखवू, असा विश्वास दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे (डीडीसीए) उपाध्यक्ष आणि भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांनी दर्शवला आहे.
‘‘या निर्णयामुळे न्यायालयाचे आम्ही आभार मानतो. त्यांनी राजधानीतील क्रिकेट चाहत्यांसाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. आता आम्ही पूर्ण क्षमता पणाला लावून हा सामना यशस्वी करून दाखवू,’’ असे चौहान यांनी सांगितले.
डीडीसीएने राज्य सरकारकडे २४.४५ कोटी रुपयांचा मनोरंजन कर भरलेला नाही. पण कोटलावर सामना खेळवण्यात यावा आणि राज्य सरकारने त्यासाठी विरोध करू नये, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे डीडीसीएला दिलासा मिळाला आहे.
चौहान पुढे म्हणाले की, ‘‘सामन्याच्या तयारीला आम्ही सुरुवात केली आहे. क्रिकेटचा सामना येथे खेळवण्यासाठी ज्यांनी आम्हाला मदत केली, त्या सर्वाचे मी आभार मानू इच्छितो. आम्ही २०१३-१४ या वर्षांचा ताळेबंद भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) सुपूर्द केला आहे. त्यांच्याच व्यक्तीने सारे लेखापरीक्षणाचे काम केले असून सारे काही नेहमीप्रमाणे पारदर्शी आहे.’’