08 March 2021

News Flash

नेशन्स लीग फुटबॉल : पोर्तुगालला नमवून फ्रान्स उपांत्य फेरीत

पोर्तुगालच्या घरच्या मैदानावर लढत खेळण्यात येत असूनही यजमानांना रोनाल्डोच्या उपस्थितीत विजेतेपद राखता आले नाही

(संग्रहित छायाचित्र)

फ्रान्सने सर्वोत्तम फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा समावेश असणाऱ्या गतविजेत्या पोर्तुगालवर १-० असा विजय मिळवत नेशन्स लीग फुटबॉलची उपांत्य फेरी गाठली.

पोर्तुगालच्या घरच्या मैदानावर लढत खेळण्यात येत असूनही यजमानांना रोनाल्डोच्या उपस्थितीत विजेतेपद राखता आले नाही. फ्रान्सचा मध्यरक्षक एनगोलो कांटेने ५३व्या मिनिटाला केलेला गोल त्यांच्या विजयात मोलाचा ठरला. ४४वी आंतरराष्ट्रीय लढत खेळणाऱ्या कांटेचा हा दुसरा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्याने याआधी २०१६मध्ये रशियाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण लढतीत गोल केला होता.

अ विभागातील तिसऱ्या गटात फ्रान्सने (१३ गुण) पोर्तुगालला तीन गुणांनी मागे टाकत अग्रस्थान पटकावले आहे. उभय संघांची अजून एक गटवार साखळीतील लढत बाकी असल्याने फ्रान्सची आगेकूच निश्चित आहे. पोर्तुगालने गेल्या वर्षी पहिल्यावहिल्या नेशन्स लीगचे विजेतेपद पटकावले होते. पोर्तुगालकडून काही दिवसांपूर्वी १०० गोल पूर्ण करणाऱ्या रोनाल्डोला प्रभाव पाडता आला नाही. पोर्तुगालची घरच्या मैदानावर स्पर्धात्मक लढत गमावण्याची ही सहा वर्षांतील पहिली वेळ ठरली आहे.

वर्नरचे दोन गोल; जर्मनीचा विजय

लिपझिग : टिमो वर्नरच्या दोन गोलच्या जोरावर जर्मनीने युक्रेनवर ३-१ असा विजय मिळवला. युक्रेनचे चार खेळाडू आणि साहाय्यक मार्गदर्शक असे मिळून एकूण पाच जण करोनाबाधित आढळल्याने ही लढत होण्याची शक्यता कमी होती. रोमान यारेमचुकने १२व्या मिनिटाला युक्रेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र जर्मनीकडून लिरॉय सेन (२३वे मिनिट) आणि वर्नर (३३वे आणि ६४वे मिनिट)  यांनी गोल करत विजयात योगदान दिले.

स्पेनने स्वित्झर्लंडला बरोबरीत रोखले

जिनिव्हा : स्पेन आणि स्वित्झर्लंड यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरीत संपली. ८९व्या मिनिटाला गेरार्ड मॉरेनोने एक गोल केल्याने स्पेनला ही बरोबरी साधता आली. मात्र पेनल्टीवरून गोल करण्यात पटाईत असलेल्या सर्जियो रामोसने पाच मिनिटांच्या अंतरात गोल करण्याच्या दोन संधी गमावल्या. ७५व्या आणि ८०व्या मिनिटाला रामोसने गोल करण्याची संधी गमावली. चौथ्या क्रमांकाच्या गटात स्पेन दुसऱ्या स्थानी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2020 12:09 am

Web Title: france beat portugal in the semifinals abn 97
Next Stories
1 Video : सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूला आली ‘लघुशंका’, खेळाडूंनी केलं ऑन कॅमेरा ट्रोल
2 IPL च्या नवीन हंगामाची तयारी सुरु, नवव्या संघासाठी अदानी ग्रुप शर्यतीत
3 सचिनसाठी आजची तारिख आहे खास; चाहते असाल तर तुम्हीही विसरणार नाही
Just Now!
X