आघाडीवीर ऑलिव्हियर गिरौडने आपल्या १००व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल झळकावल्यामुळे फ्रान्सने आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत युक्रेनसारख्या बलाढय़ संघाचा ७-१ असा धुव्वा उडवला.

युवा खेळाडू एडवाडरे कॅमाविंगा याने नवव्या मिनिटालाच फ्रान्सचे खाते खोलल्यानंतर गिरौडने २४व्या आणि ३३व्या मिनिटाला गोल लगावत फ्रान्सला ३-० असे आघाडीवर आणले होते. विताली मायकोलेंको याच्या स्वयंगोलमुळे फ्रान्सने पहिल्या सत्रात ४-० अशी भक्कम आघाडी घेतली होती. खेळाडूंना झालेली करोनाची लागण तसेच दुखापती यामुळे युक्रेनला आपला अव्वल संघ मैदानात उतरवता आला नाही.

फ्रान्सचे प्रशिक्षक दिदियर देसचॅम्प्स यांनी दुसऱ्या सत्रात किलियन एम्बाप्पे आणि विक्टर सायगानकोव्ह यांना संधी दिली. त्यानंतर कोरेन्टिन टोलिस्सो, एम्बाप्पे आणि अँटोनी ग्रिएझमान यांनी गोल करत फ्रान्सच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

पोर्तुगालची स्पेनशी बरोबरी

जवळपास २५०० चाहत्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात पोर्तुगालने स्पेनविरुद्ध गोलशून्य बरोबरी पत्करली. पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि स्पेनचा युवा खेळाडू अन्सू फाटी यांच्यात गोल करण्यासाठी चढाओढ रंगण्याची शक्यता होती. पण स्पेनने फाटीला मैदानावर उतरवलेच नाही. रोनाल्डोने पहिल्या सत्राआधी हेडरवर गोल करण्याची संधी वाया घालवली. त्यानंतर ५३व्या मिनिटाला रोनाल्डोने डाव्या पायाने मारलेला जोरकस फटका क्रॉसबारला लागून बाहेर गेला.

मेक्सिकोचा नेदरलँड्सवर विजय

आघाडीवीर राऊल जिमेनेझ याने पेनल्टीवर केलेल्या गोलमुळे मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात मेक्सिकोने नेदरलँड्सवर १-० अशी मात केली. नॅथन आकेच्या चुकीमुळे ६०व्या मिनिटाला मेक्सिकोला पेनल्टी-किक मिळाली. त्यावर जिमेनेझ याने कोणतीही चूक न करता गोल करत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली. ८८व्या मिनिटाला नेदरलँड्सला बरोबरीची संधी होती, पण लुक डे जाँगने मारलेला फटका थेट गोलरक्षक अल्फ्रेडो तालावेराच्या हातात गेला. त्यानंतर मेम्फिस डिपे याने मारलेला फटका गोलजाळ्याच्या जवळून गेला.

नेयमारला पाठीची दुखापत

ब्राझीलचा आघाडीवीर नेयमार याला पाठीच्या दुखापतीचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्याने बुधवारी सराव करणे थांबवले. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बोलिव्हियाविरुद्धच्या विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यासाठी त्याच्या उपलब्धतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.