संतोष सावंत

स्थळ : बिग बॉसचे घर

 वेळ : सकाळी सात

(अचानक मोठय़ा आवाजात सायरन वाजू लागतो. झोपलेली सगळी मंडळी खडबडून जागी होतात. एक जण मात्र अजूनही चादरीत गुरफटून झोपलेला आहे. बिग बॉसचा आवाज घुमतो.)

‘‘गुड मॉर्निग, आज बिग बॉसच्या या घरात तुमचा तिसरा दिवस आहे. सुरुवातीचे दोन दिवस मी तुमच्यावर कोणत्याही प्रकारची बंधने घातली नाहीत. तुमच्यावर दडपण येऊ  नये याची संपूर्ण दक्षता घेतली. आजपासून मात्र मी दिलेली कामे तुम्हाला पार पाडावीच लागतील. जर या घरात टिकून राहून करोडो रुपये जिंकायचे असतील तर तुम्हाला आपली पात्रता सिद्ध करावीच लागेल. काय कळतंय का? ..आणि हा कोण झोपला आहे अजून? त्याला सांगा बॅग भर आणि आताच हे घर सोडून निघून जा! हा खेळ क्रिकेट इतका सोपा नाही. एकदम सीरियस मामला आहे !’’

(सगळे लगबगीने त्याला उठवतात. हा मलिंगा आहे. मलिंगा आळोखेपिळोखे देत जागा होतो. अचानक उभा राहतो. व्यायाम करायला सुरुवात करतो. तेवढय़ात त्याचे लक्ष अवाक्  होऊन पाहणाऱ्या सर्वाकडे जाते. तो मानेनेच सर्वाना अभिवादन करतो. इतक्यात बिग बॉसचा आवाज पुन्हा घुमतो.)

‘‘मलिंगा, आपण सात वाजता उठणे अपेक्षित होते.’’

‘‘येस सर, मी संध्याकाळी सात वाजताच उठणार होतो; पण या लोकांनी मला आधीच गदागदा हलवून उठवले. तुम्ही यांना चांगला दम भरा.’’ मलिंगा निरागस स्वरात सांगतो आणि त्याचे बोलणे ऐकून सगळे हसू लागतात.

‘‘शांत राहा, मलिंगा..! मी सकाळी सात वाजता उठण्याबद्दल बोलत आहे. या घरात राहायचे असेल तर इथले नियम पाळावेच लागतील. मान्य आहे ना सर्वाना?’’ बिग बॉसच्या या प्रश्नावर सगळ्या म्हणजेच दहाही क्रिकेटपटूंनी मान हलवून होकार दिला.

‘‘गुड, तुमचे आजचे टास्क आहे खमंग नाश्ता तयार करणे. सारे आवश्यक सामान किचनमध्ये ठेवलेले आहे. भांडीही आहेत तिथे. यासाठी तुम्ही चार खेळाडूंची निवड करायची आहे. माझी बारीक नजर आहेच तुमच्यावर.’’ एवढे बोलून बिग बॉस बोलायचे थांबले.

बुमराहने या खाद्यमोहिमेचे नेतृत्व स्वीकारले. ‘‘मी हे कार्य पार पाडू शकतो. मला फक्त दोन तास द्या. मी पटापट आवरतो आणि नाश्ता बनवतो,’’ असे म्हणत मलिंगाने हात वर केला. अर्थातच सर्वानी त्याला नाकारले. ‘‘माझ्या कोपराला जबरदस्त मार बसला आहे, नाही तर मी नक्कीच पुढाकार घेतला असता,’’ असे म्हणत सर्फराजने सपशेल माघार घेतली. ‘‘माझ्या गुडघ्यावर सात-आठ शस्त्रक्रिया झाल्या आहेत तरीही मी मदत करायला तयार आहे,’’ अशी मश्रफी मोर्तझाने कळकळ दाखवली; पण डेव्हिड वॉर्नरने त्याला थांबवून आपण स्वत:च जबाबदारी घेतली. तेवढय़ात शाकिब अल हसन आणि ख्रिस गेल यांच्यात काही तरी वाजले. ते चक्क हमरातुमरीवर आले आणि त्यामुळे त्या दोघांनाही बाद करण्यात आले. ‘‘यंदा माझ्या हाताला फारशी चव नाही,’’ असे म्हणत फॅफ डय़ू प्लेसिसने असमर्थता दर्शवली आणि मग उरलेल्या केन विल्यमसन आणि ईऑन मॉर्गन यांचा अपरिहार्यपणे संघात समावेश करण्यात आला.

स्थळ : स्वयंपाकघर

वेळ: सकाळचे नऊ

गेला अर्धा तास विल्यमसन, वॉर्नर, मॉर्गन आणि बुमराह आपल्या समोर साहित्य मांडून विचार करत बसले होते. बटाटे, कांदे, मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, हळद, मीठ, मोहरी, बेसन आणि तेल या साहित्याचा वापर करून नेमके काय बनवायचे याबाबत त्यांचे एकमत होत नव्हते. विल्यमसन म्हणत होता, आपण कोलकॅनन बनवू या, तर स्कॅलोप्स बनवू या, असा वॉर्नरचा हट्ट होता. रोस्ट पटॅटो करू या, असे मॉर्गन म्हणत होता; परंतु बुमराला मात्र त्या साहित्यात दडलेले बटाटेवडे दिसत होते. शेवटी बुमराच्या नेतृत्वाखाली सगळे कामाला लागले. १५-२० मिनिटांनंतर स्वयंपाकघरामधून खमंग वास येऊ  लागला आणि उरलेली सर्व मंडळीही तिथेच जमा होऊन भारताचे गुणगान गाऊ  लागली. कढईतून पहिला गरमागरम वडा बाहेर पडला आणि.. जोरात अलार्म वाजला!

..भाईजान झोपेतून जागे झाले. त्यांच्या मनात विचार आला, काय जबरदस्त स्वप्न होते. बिग बॉसच्या पुढील हंगामासाठी हीच कल्पना वापरायची असे आता त्यांनी आपल्या मनाशी पक्के केले होते.