नँटिस (फ्रान्स) येथे सुरू असलेल्या अ‍ॅलेक्सि व्हॅस्टिने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अमित पंघाल (५२ किलो),  कविंदर सिंग बिश्त (५७ किलो) आणि संजीत (९१ किलो) यांनी दिमाखदार विजयांसह अंतिम फेरी गाठली आहे.

चार वेळा आशियाई पदक विजेत्या शिवा थापाला (६३ किलो) कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत लॉनीस हॅम्राओऊने त्याला २-१ असे नामोहरम केले.

आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक विजेत्या कविंदरने फ्रान्सच्या बेनिस जॉर्ज मेल्कुमियानचा ३-० असा पाडाव केला. जेतेपदासाठी त्याचा फ्रान्सच्या सॅम्युएल किस्तोहरीशी सामना होणार आहे. इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या संजीतने अमेरिकेच्या शेरॉड फुल्गमचा २-१ असा पराभव केला. त्याच्यापुढे अंतिम फेरीत सोहेब बॉफियाचे आव्हान असेल. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या अमितने अमेरिकेच्या ख्रिस्टोफर हेरेराला नमवले.

मार्चनंतर भारताचे बॉक्सर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळत आहेत.