* गार्बिन मुगुरुझाची जेतेपदाला गवसणी
* २२व्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचे सेरेनाचे स्वप्न भंगले
रोलँड गॅरोसची लाल माती हा स्पेनच्या राफेल नदालचा बालेकिल्ला. यंदा दुखापतीमुळे नदालने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली. मात्र गार्बिन मुगुरुझाच्या रुपात स्पेनचा झेंडा शनिवारी फडकला. पहिलेवहिले ग्रँड स्लॅम जेतेपद सर करण्यासाठी गार्बिनच्या वाटेत सेरेना विल्यम्सचे खडतर आव्हान होते. वय, अनुभव आणि कर्तृत्व या तिन्ही आघाडय़ांवर अनेक पटींनी सरस असणाऱ्या सेरेनाला सरळ सेट्समध्ये नमवण्याची किमया गार्बिनने केली. गार्बिनचा बॅकहँड सेरेनाला परतावता आला नाही आणि त्याबरोबर गार्बिनने लाल मातीवर लोळण घेतली. लोभसवणाऱ्या पिवळ्या रंगाच्या पेहरावातल्या आणि लाल मातीवर विसावलेल्या गार्बिनची छबी यंदाच्या स्पर्धेचे क्षणचित्र ठरले.
अंतिम लढतीत २२ वर्षीय गार्बिनने सेरेनावर ७-५, ६-४ असा विजय मिळवला. कारकीर्दीतले गार्बिनचे हे पहिलेच ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणारी गार्बिन ही १९९८नंतरची पहिलीच स्पेनची खेळाडू आहे. फ्लॅव्हिआ पेनेट्टा (अमेरिकन स्पर्धा), अँजेलिक कर्बर (जर्मनी) यांच्यानंतर गार्बिन पहिले ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारी तिसरी खेळाडू ठरली. यंदाच्या वर्षांतला सेरेनाचा ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीतला दुसरा सलग पराभव आहे. फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या जेतेपदासह २२वे विक्रमी ग्रँड स्लॅम पटकावण्याची सेरेनाला संधी आहे. मात्र दुखापतीमुळे आलेल्या मर्यादा आणि गार्बिनच्या सर्वागीण खेळासमोर सेरेना निष्प्रभ ठरली. मानांकित महिला टेनिसपटू गाशा गुंडाळत असताना चौथ्या मानांकित गार्बिनने खणखणीत सव्‍‌र्हिस, परतीचा प्रभावी फटका आणि चिवट खेळाच्या जोरावर बाजी मारली.
सेरेनासारख्या मातब्बर खेळाडूविरुद्ध ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी अनोखा अनुभव आहे. अंतिम लढतीत माझ्याकडून जसा खेळ अपेक्षित होता तसा झाला आणि ग्रँड स्लॅम जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. सेरेना ताकदवान खेळाडू आहे. संघर्ष करत प्रत्येक गुण कमावला म्हणूनच विजयाचा आनंद आणि समाधान प्रचंड आहे.