माजी विजेत्या जोकोव्हिचचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात

पराभवाच्या छायेतून मुसंडी मारून विजयश्री खेचून आणण्यात सरावलेल्या नोव्हाक जोकोव्हिचचे फ्रेंच खुल्या टेनिस स्पध्रेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले.

इटलीच्या मार्को सॅचिनाटोविरुद्ध माजी विजेत्या नोव्हाकचे (२०१६चा विजेता) पारडे जड होते, परंतु २५ वर्षीय सॅचिनाटोने पहिले दोन सेट घेत सर्वाना आश्चर्यचकित केले. तरीही चाहत्यांनी नोव्हाककडून पुनरागमनाच्या आशा कायम राखल्या होत्या. त्यांच्या या अपेक्षांना साजेसा खेळ करताना नोव्हाकने जोरदार मुसंडी मारली खरी, परंतु सॅचिनाटोच्या मजबूत निर्धारासमोर कुठेतरी तो कमी पडला. सॅचिनाटोने टायब्रेकपर्यंत रंगलेल्या चौथ्या सेटमध्ये नोव्हाकच्या तंदुरुस्तीचा कस पाहिला आणि तोडीसतोड खेळ करताना बाजी मारली. नोव्हाकने या टायब्रेकरमध्ये तीन वेळा सॅचिनाटोचे मॅच पॉईंट हिसकावून घेतले. तरीही त्याला पराभव टाळता आला नाही.

प्रेक्षकांचा पाठींबा नोव्हाकच्या बाजूने असूनही सॅचिनाटोने आपले मनोबल खचू न देता जवळपास ३ तास २६ मिनिटे चाललेल्या लढतीत ६-३, ७-६(७-४), १-६, ७-६ (१३-११) अशी बाजी मारली.  जागतिक क्रमवारीत खालच्या स्थानावर असूनही १९९९नंतर फ्रेंच खुल्या स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा सॅचिनाटो पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी अँड्रेई मेडव्हेडेव्ह (१०० क्रमवारी) यांनी १९९९ मध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

अन्य लढतीत अमेरिकेच्या मेडिसन कीज व स्लोएनी स्टीफन्स यांनी शानदार विजय मिळवत फ्रेंच खुल्या स्पर्धेत प्रथमच एकेरीच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. पुरुष गटात सातव्या मानांकित डॉमिनिक थिमनेही एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. थिमने अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्हची अनपेक्षित विजयाची मालिका ६-४, ६-२, ६-१ अशी खंडित केली. त्याने क्रॉसकोर्ट फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने नेटजवळून प्लेसिंगचा कल्पकतेने उपयोग केला. महिलांमध्ये मेडिसनने चुरशीच्या लढतीत युलिया पुतिनत्सेवाचा ७-६ (७-५), ६-२ असा पराभव केला. दहाव्या मानांकित स्टीफन्सने रशियाच्या दारिया कसात्किनाला ६-३, ६-१ असे सहज पराभूत केले.

अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेलपोत्रो या पाचव्या मानांकित खेळाडूने जॉन इस्नेरचा ६-४, ६-४, ६-४ असा सहज पराभव केला. २०१२ नंतर प्रथमच त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याच्यापुढे मरीन चिलीचचे आव्हान असणार आहे. तृतीय मानांकित गर्बिन मुगुरुझाविरुद्ध लेसिया त्सुरेन्कोने माघार घेतल्यामुळे केवळ दोन गेम्स खेळल्यानंतर मुगुरुझाला उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला. मुगुरुझाला पुढच्या सामन्यात दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मारिया शारापोव्हाशी खेळावे लागणार आहे. शारापोव्हाविरुद्धच्या लढतीतून सेरेना विल्यम्सने सामना सुरू होण्यापूर्वीच दुखापतीमुळे माघार घेतली होती. येथे चौथ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या मुगुरुझाने सांगितले,‘‘ त्सुरेन्कोविरुद्ध चिवट लढत खेळण्यासाठी मी उत्सुक होते. मात्र तिने माघार घेतल्यामुळे मीदेखील निराश झाले. असा विजय मला नको होता. आता शारापोव्हाशी मला खेळावयाचे आहे. हा सामना जिंकण्यासाठी मी शिकस्त करणार आहे.’’

महिलांच्या दुहेरीत जपानच्या एरी होशुमा व माकोतो निनोमिया यांनी गॅब्रिएला दाब्रोवस्की व झुई यिहान या जोडीवर ६-१, ६-२ असा दणदणीत विजय मिळविला. बाबॅरा स्ट्रायकोव्हा व आंद्रिया ल्हॅव्हेकोवा यांनी दुआन यिंगमिंग व अलिझांड्रा सास्नोविच यांचा ६-३, ६-३ असा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिमिया बाबोस व ख्रिस्तिना मॅलेडेनोव्हिक यांनी निकोली मेलीचर व क्वेटा पेश्को यांचे आव्हान ४-६, ६-२, ७-५ असे संपुष्टात आणले. इरिना बारा व मिहेला बुझार्नेस्कू यांनी जेनिफर ब्रॅडी व व्हॅनिया किंग यांना ६-४, ६-३ असे पराभूत केले. पुरुषांच्या दुहेरीत ऑलिव्हर मराच व मॅट पेव्हिक यांनी रॉबर्ट फराह व जुआन सेबॅस्टियन यांच्यावर ३-६, ६-४, ६-३ अशी मात करीत उपांत्य फेरी गाठली. पहिला सेट गमावल्यानंतर मराच व पेव्हिक यांनी सव्‍‌र्हिस, व्हॉलीज व परतीचे फटके यावर योग्य नियंत्रण ठेवीत विजयश्री खेचून आणली.

दरम्यान, भारताचे या स्पध्रेतील आव्हानही संपुष्टात आले. भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा फ्रान्सचा सहकारी ई. रॉजर व्हॅसेलिन या जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. क्रोएशियाच्या निकोला मेकटिक आणि ऑस्ट्रियाचा अलेक्झांडर पेया या जोडीने ७-६(७/४), ६-२ असा १ तास ३२ मिनिटांत विजय मिळवला.

ही लढत अविश्वसनीय होती. मी चांगली सुरुवात केली, परंतु नोव्हाकने जबरदस्त पुनरागमन करताना सामन्यात चुरस निर्माण केली. चौथ्या सेटमध्ये मी ३-४ मॅच पॉईंट गमावले. मात्र, सुदैवाने मला विजयश्री खेचून आणण्यात यश आले. नोव्हाकप्रमाणे मीही थकलो होतो. आमच्या दोघांची शारीरिक कसोटी पाहणारा हा सामना ठरला. विजयाचा केलेला निर्धार पुर्णत्वास नेल्याचा आनंद आहे.  या विजयाने माझा आत्मविश्वास वाढला आहे.

मार्को सॅचिनाटो