पॅरिस : संघर्षपूर्ण लढतीनंतर सायना नेहवालचे फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. एकेरीच्या उपांत्यपूर्व सामन्यात शुक्रवारी कोरियाच्या अ‍ॅन से यंगने तिला नामोहरम केले.

फ्रेंच खुल्या स्पर्धेत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या २९ वर्षीय सायनाची वाटचाल जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावरील यंगने खंडित केली. ४९ मिनिटे चाललेला हा सामना यंगने २२-२०, २३-२१ अशा फरकाने जिंकला.

जानेवारी महिन्यात इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यानंतर सायनाला नंतरच्या सर्वच स्पर्धामध्ये झगडावे लागले होते. एप्रिल महिन्यात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. मग चीन, कोरिया आणि डेन्मार्क येथे झालेल्या स्पर्धामध्ये सायनाला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.

पहिल्या गेममध्ये यंगने ७-२ अशी आघाडी घेतली. परंतु सायनाने ही दरी ७-८ अशी कमी करून मग १५-१२ अशी आघाडी घेतली. मग यंगने सातत्यपूर्ण खेळाच्या बळावर सायनाला १८-१५ असे मागे टाकले. तिने २०-१९ अशी मजल मारताना ‘गेम पॉइंट’सुद्धा मिळवला. परंतु तीन सलग गुणांसह सायनाने पहिला गेम जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये यंगने पुन्हा झोकात सुरुवात करीत ५-२ अशी आघाडी घेतली. मग यंगने १६-११ अशा आघाडीसह विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले, परंतु अनुभवी सायनाने १८-१८ अशी बरोबरी साधली. सायनाने मग तीन गुणांसह २१-२० अशी मजल मारली. परंतु यंगने पुन्हा सलग तीन गुणांसह सामना जिंकला.