पॅरिस : फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेचा माजी विजेता स्टॅनिस्लॉस वॉवरिंकाला पाच फेरीपर्यंत झुंज देऊनही युवा खेळाडू ह्य़ुगो गॅस्टनकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. तसेच राफेल नदाल, अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि किकी बेर्टेन्स यांनी आपापले सामने सहज जिंकत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची चौथी फेरी गाठली.

तीन ग्रँडस्लॅम विजेत्या वॉवरिंकाविरुद्ध गॅस्टनने अप्रतिम कामगिरीचे प्रदर्शन केले. तीन तास, १० मिनिटे रंगलेल्या लढतीत गॅस्टनने २-६, ६-३, ६-३, ४-६, ६-० असा विजय मिळवला. आता गॅस्टनला पुढील फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिम याचा सामना करावा लागेल.

स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने इटलीच्या स्टेफानो ट्रॅव्हाग्लिया याचा अवघ्या दीड तासात ६-१, ६-४, ६-० असा सहज फडशा पाडला. फ्रेंच स्पर्धेचे १३वे जेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या नदालला चौथ्या फेरीत अमेरिकेच्या सेबॅस्टियन कोर्डा याच्याशी दोन हात करावे लागतील. कोर्डाने प्रेडो मार्टिनेझला ६-४, ६-३, ६-१ असे पराभूत केले. जर्मनीच्या सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने मार्को चेचिनाटो याचे आव्हान ६-१, ७-५, ६-३ असे परतवून लावले. झ्वेरेवची चौथ्या फेरीत इटलीच्या यानिक सिन्नरशी गाठ पडणार आहे.

महिलांमध्ये, नेदरलँड्सच्या पाचव्या मानांकित बेर्टेन्सने कॅटरिना सिनियाकोव्हाला ६-२, ६-२ असे नमवून २०१६नंतर प्रथमच फ्रेंच स्पर्धेची चौथी फेरी गाठली.

’ वेळ : दुपारी २.३० पासून

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २