पाव्हल्यूचेन्कोव्हा आणि क्रेजिकोव्हा यांच्यात आज महिला एकेरीची अंतिम लढत

पॅरिस : नामांकित खेळाडूंचे आव्हान सुरुवातीलाच संपुष्टात आल्यानंतर आता फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत नवी विजेती मिळणार आहे. रशियाची ३१वी मानांकित अ‍ॅनास्तासिया पाव्हल्यूचेन्कोव्हा आणि चेक प्रजासत्ताकची बाबरेरा क्रेजिकोव्हा यांच्यात शनिवारी महिला एकेरीची अंतिम लढत रंगणार आहे.

२००६मध्ये कनिष्ठ गटाची अंतिम फेरी खेळणाऱ्या पाव्हल्यूचेन्कोव्हाने आपल्या ताकदवान खेळाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तब्बल १५ वर्षांनंतर अनेक चढउतारांना सामोरे जात कारकीर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याची संधी तिच्यासमोर आहे. पाव्हल्यूचेन्कोव्हाने उपांत्य फेरीत स्लोव्हेनियाच्या तामरा झिदानसेक हिचे आव्हान दोन सेटमध्ये सहज परतवून लावले होते. जमिनीलगतचे फटके लगावण्यात पटाईत असलेल्या पाव्हल्यूचेन्कोव्हाने अंतिम फेरीच्या प्रवासापर्यंत आर्यना सबालेंका आणि विक्टोरिया अझारेंका यांचा पाडाव केला होता.

काही दिवसांपूर्वी स्ट्रान्सबर्ग येथे जेतेपद पटकावणाऱ्या क्रेजिकोव्हाने कारकीर्दीत ३३व्या क्रमांकावर मजल मारली होती. पण उपांत्य फेरीत ग्रीसच्या मारिया सकारी हिच्याबरोबर तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत विजय मिळवून क्रेजिकोव्हाने कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली. प्रतिस्पध्र्याच्या शैलीनुसार झटकन आपल्या खेळात बदल करणाऱ्या क्रेजिकोव्हाच्या कडव्या आव्हानाला पाव्हल्यूचेन्कोव्हाला सामोरे जावे लागेल. पाव्हल्यूचेन्कोव्हा आणि क्रेजिकोव्हा प्रथमच एकमेकींसमोर उभ्या ठाकल्या असून अनुभवाच्या बाबतीत पाव्हल्यूचेन्कोव्हाचे पारडे जड आहे.

’ सामन्याची वेळ : सायं. ६.३० वा.

’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या