फ्रेंच खुली बॅडमिंटन स्पर्धा : – सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या आघाडीच्या जोडीने अंतिम फेरीत कडवी लढत दिली. परंतु त्यांना फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. इंडोनेशियाच्या अग्रमानांकित मार्कस गिडेऑन आणि केव्हिन सुकामुल्जो यांनी सात्त्विक-चिराग यांचा २१-१८, २१-१६ असा पराभव केला.

ऑगस्ट महिन्यात सात्त्विक-चिराग जोडीने थायलंड खुल्या स्पर्धेच्या निमित्ताने पहिलेवहिले ‘सुपर ५००’ दर्जाचे जेतेपद पटकावले होते. आता ‘वर्ल्ड टूर फायनल्स’ स्पध्रेत स्थान मिळवणारी ही पुरुष दुहेरीतील भारताची पहिली जोडी ठरली आहे.

जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या भारताच्या जोडीला अंतिम फेरीत संघर्ष करावा लागला. आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या सात्त्विक-चिराग जोडीला चांगली सुरुवात करता आली नाही. मार्कस-केव्हिन यांच्या दमदार स्मॅशेसना त्यांच्याकडे उत्तर नव्हते. सात्त्विक-चिरागचे अनेक फटके नेटवर जात असल्यामुळे मार्कस-केव्हिन यांना सहजपणे गुण मिळत होते. त्यामुळे इंडोनेशियाच्या जोडीने सुरुवातीला ७-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर सात्त्विक-चिराग यांनी दमदार खेळ करत ही पिछाडी ७-९ अशी भरून काढली. पहिला गेम १६-१५ अशा रंगतदार अवस्थेत असताना मार्कस-केव्हिन यांनी शानदार खेळ करत २१-१८ अशा फरकाने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्येही चिराग-सात्त्विक यांना लय सापडली नाही. त्यामुळे मार्कस-केव्हिन यांनी ६-३ अशी आघाडी घेतली होती. परंतु सात्त्विक-चिरागने त्यांना तोलामोलाची टक्कर दिली. पण अखेरीस त्यांना हार पत्करावी लागली.