निशिकोरी, स्ट्रायकोव्हा उपउपांत्यपूर्व फेरीत; दिमित्रोव पराभूत, विल्यम्स भगिनींची आगेकूच

पॅरिस : विजेतेपदाचा दावेदार नोव्हाक जोकोव्हिचने रॉबर्ट बॅटिस्टा अ‍ॅग्यूटवर ६-४, ६-७ (६-८), ७-६ (७-४), ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली.

जागतिक क्रमवारीतील माजी अग्रस्थानावरील टेनिसपटू जोकोव्हिचने तीन तास आणि ४८ मिनिटांच्या चार सेटमधील लढतीत १३व्या मानांकित बॅटिस्टाचा पाडाव केला. ३१ वर्षीय जोकोव्हिाचने आपल्या कारकिर्दीत ४३व्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा पराक्रम केला आणि जिमी कॉनर्सच्या विक्रमाची बरोबरी केली.

केई निशिकोरी, अ‍ॅलेक्झांडर झ्वेरेव्ह या मानांकित खेळाडूंनी चौथ्या फेरीकडे वाटचाल केली. मात्र ग्रिगोर दिमित्रोव या चौथ्या मानांकित खेळाडूला पराभवाचा धक्का बसला.

जपानच्या निशिकोरीने गिलेस सिमोनवर ६-३, ६-१, ६-३ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळवला. द्वितीय मानांकित झ्वेरेव्हने दामिर दिझुम्हुरला ६-२, ३-६, ४-६, ७-६ (७-३), ७-५ असे हरवले.

पुरुषांच्या दुहेरीत भारताला संमिश्र यश लाभले. भारताच्या रोहन बोपण्णाने एडवर्ड रॉजर व्हॅसेलीन याच्या साथीने बेंजामिन बोन्झी व ग्रेगोरी जॅक यांचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवला. बोपण्णाला मिश्रदुहेरीत तिमिया बाबूसच्या साथीने पराभव पत्करावा लागला. त्यांना जॉन पिअर्स व शुई झाँग यांनी ६-२, ६-३ असे हरवले. पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या युकी भांब्री व दिविज शरण यांचे आव्हान संपले. त्यांना ऑलिव्हर मराच व मॅट पेव्हिक यांनी ७-५, ६-३ असे हरवले.

महिलांमध्ये बार्बोरा स्ट्रायकोव्हाने कॅटरिना सिनियाकोवाची अनपेक्षित विजयाची मालिका ६-२, ६-३ अशी खंडित केली. जपानच्या नाओमी ओसाकाला १३व्या मानांकित मेडिसन कीजने ६-१, ७-६ (७-५) असे पराभूत केले. दरम्यान गुरुवारी झालेल्या लढतीत सेरेना विल्यम्सने अ‍ॅशलीघ बार्टीवर ३-६, ६-३, ६-४ असा विजय संपादन केला. पहिला सेट गमावल्यावर सेरेनाने लौकिकास साजेसा चतुरस्र खेळ केला व सामना आपल्या बाजूने झुकवला. सेरेनाने व्हीनसच्या साथीने सारा इराणी व फ्लिपकिन्स कर्स्टन यांचा ६-४, ६-२ असा सहज पराभव केला.