जागतिक क्रमवारीतील अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोव्हिचच्या मदतीला पाऊस धावून आला. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत रॉबर्टा बॅटिस्टा अ‍ॅग्युट याच्याविरुद्ध त्याने पहिला सेट गमावल्यानंतर पावसाच्या व्यत्ययाने सामना थांबला. त्यामुळे जोकोव्हिचला या सेटमध्ये झालेल्या चुकांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली.

फ्रेंच खुल्या स्पध्रेचे पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी उत्सुक असलेला जोकोव्हिच हा येथे रॉबर्टाविरुद्ध सामना खेळण्यासाठी मैदानावर आला, त्या वेळी पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या. पहिल्या सेटमध्ये त्याला अपेक्षेइतका अव्वल दर्जाचा खेळ करता आला नाही. केवळ ३७ मिनिटे चाललेल्या या सेटमध्ये त्याची सव्‍‌र्हिस तीन वेळा तोडली गेली. त्याने दोन वेळा सव्‍‌र्हिसब्रेक मिळवला. खरे तर त्याने सव्‍‌र्हिसब्रेक करीतच या सेटमध्ये झकास सुरुवात केली होती. मात्र परतीच्या फटक्यांवर त्याचे नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे हा सेट त्याला ३-६ असा गमवावा लागला. जर जोकोव्हिचने येथे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले तर तो कारकीर्दीत दहा कोटी डॉलर्स पारितोषिकाचा टप्पा ओलांडू शकेल. जोकोव्हिचने आतापर्यंत रॉबर्टाविरुद्ध झालेल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

मुसळधार पावसामुळे सोमवारी एकही सामना होऊ शकला नाही. मंगळवारीदेखील सामने सुरू होण्यास विलंब लागला. त्सेवात्ना पिरानकोवा (बल्गेरिया) व द्वितीय मानांकित खेळाडू अग्निझेका रडवानस्का या महिलांच्या लढतीत पावसामुळे खेळ थांबला, त्या वेळी पिरानकोवा हिच्याकडे ६-२, ३-० अशी आघाडी होती. रविवारी रात्री हा सामना अंधूक प्रकाशामुळे अपूर्ण राहिला होता. मंगळवारी हा सामना पुढे सुरू झाला, तेव्हा पिरानकोवाने सलग सहा गेम्स घेत आपली बाजू वरचढ केली होती.

समंथा स्टोसूरने सहाव्या मानांकित सिमोना हॅलेपविरुद्ध ७-६ (७-३), ३-२ अशी आघाडी घेतली असताना पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. स्टोसूरने ३-५ अशा पिछाडीवरून पहिला सेटजिंकला.

पुरुष गटात अपूर्ण राहिलेल्या सामन्यात ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थिएमने स्पेनच्या मार्सेल ग्रॅनोलर्सविरुद्ध ५-२ अशी आघाडी मिळवली होती.

‘‘सोमवारी पावसामुळे सामने झाले नाहीत. त्यामुळे आम्हाला २० लाख युरोचे नुकसान सोसावे लागले आहे. पुरुषांचा अंतिम सामना सोमवारी घेण्याबाबत आम्हाला स्वारस्य नाही. सर्व सामने रविवापर्यंत पूर्ण होतील अशी आम्हाला आशा आहे,’’ असे स्पर्धेचे संचालक गे फर्गेट यांनी सांगितले.

पुरुषांचा अंतिम सामना सोमवारी खेळवण्याचा प्रसंग यापूर्वी १९७३ व २०१२ मध्ये अनुभवास आला होता. २०१२च्या अंतिम लढतीत राफेल नदालने जोकोव्हिच याच्यावर मात करीत अजिंक्यपद मिळविले होते.