आजपासून रंगणाऱ्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंसमोर कडवे आव्हान

पॅरिस : जवळपास दोन महिन्यांपूर्वी जगज्जेतेपद मिळवल्यानंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूची कामगिरी काहीशी ढासळली आहे. त्यामुळेच मंगळवारपासून सुरू होणाऱ्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तिची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सिंधूव्यतिरिक्त अन्य भारतीय खेळाडूंनाही या स्पर्धेतील पहिल्याच फेरीत कडव्या प्रतिस्पध्र्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या सिंधूने ऑगस्ट महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकुहाराला धूळ चारून कारकीर्दीत पहिल्यांदाच जगज्जेतेपद मिळवले होते. परंतु त्यानंतर झालेल्या चीन, कोरिया, डेन्मार्क या स्पर्धामध्ये सिंधूला किमान उपांत्यपूर्व फेरी गाठणेही जमले नाही.

पाचव्या मानांकित सिंधूचा पहिल्या फेरीतच कॅनडाच्या नवव्या मानांकित मिशेल ली हिच्याशी सामना होणार आहे. तर पुढील फेरी गाठल्यास सिंधूची अग्रमानांकित ताई झू यिंगशी गाठ पडण्याची शक्यता आहे.

सिंधूव्यतिरिक्त अनुभवी सायना नेहवालकडूनही चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. क्रमवारीत आठव्या स्थानी असलेल्या सायनाला पहिल्या लढतीत हाँगकाँगच्या चेउंग नॅग्न हिचा सामना करावयाचा होता.

श्रीकांतपुढे कामगिरी उंचावण्याचे आव्हान

पुरुष एकेरीत २०१७च्या विजेत्या किदम्बी श्रीकांतपुढे कामगिरी उंचावण्याचे आव्हान असणार आहे. श्रीकांतची सलामीच्या सामन्यात चायनीज तैपईच्या चोऊ चेनशी गाठ पडणार आहे. पारुपल्ली कश्यपचा हाँगकाँगच्या का लाँग अँगुसविरुद्ध पहिला सामना रंगेल.

सात्त्विक-चिरागकडून आशा

पुरुष दुहेरीत विजेतेपद मिळवणाऱ्या भारताच्या सात्त्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची नेदरलँड्सच्या जेले मास आणि रॉबिन टेबलिंग यांच्याशी लढत रंगणार आहे.