भारताच्या रामकुमार रामनाथनचे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅमच्या मुख्य एकेरीत पात्र ठरण्याचे स्वप्न पुन्हा भंगले. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत भारताकडून अंकिता रैनाने सर्बियाच्या जोव्हाना जॉव्हिचला नमवत आगेकूच केली. अंकिताने ही लढत ६-४, ४-६, ६-४ अशी जिंकली.

रामकुमारला त्याच्यापेक्षा क्रमवारीने कमी असणाऱ्या फ्रान्सच्याच ट्रिस्टन लॅमसिनकडून पराभवाचा धक्का बसला. रामकुमारने ही लढत ५-७, २-६ अशी गमावली. जागतिक क्रमवारीत रामकुमार १९८व्या स्थानावर असून त्याखालोखाल लॅमसीन २६८व्या स्थानी आहे. २०१५ पासून रामकुमार पुरुष एकेरीच्या ग्रँडस्लॅमच्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहे. रामकुमारच्या पराभवामुळे पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीत भारताच्या अपेक्षा एकमेव प्रज्ञेश गुणेश्वरनकडून आहेत. सुमित नागलचादेखील याआधीच पराभव झाला आहे.

महिला खेळाडू करोनाबाधित

फ्रेंच खुल्या पात्रता टेनिस स्पर्धेत मंगळवारपासून महिलांच्या एकेरी स्पर्धाना सुरुवात झाली. मात्र त्यापूर्वी एक महिला खेळाडू करोनाबाधित असल्याचे आढळले आहे. मात्र त्या खेळाडूचे नाव फ्रेंच टेनिस महासंघाने घोषित केलेले नाही. त्या खेळाडूला सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे.