फ्रेंच ओपन बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधूचं आव्हान लगेचच संपुष्टात आलं. जपानच्या अकाने यामागुचीने सिंधूचा दोन सरळ सेट्समध्ये पराभव केला. २१-१४, २१-९ अशा सेट्समध्ये यामागुचीने सिंधूचं आव्हान परतवून लावलं. हा सामना कमालीचा एकतर्फी झालेला पहायला मिळाला. दोनही सेट्समध्ये सिंधूने यामागुचीच्या खेळीचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही.

अवश्य वाचा – चिनी खेळाडूंची मक्तेदारी मोडीत काढत किदम्बी श्रीकांतचा विक्रम

संपूर्ण सामन्यात सिंधूचा एकदाही यामागुचीच्या खेळापुढे निभाव लागला नाही. पहिल्या सेटमध्ये पॉईंट मिळवत यामागुचीने आक्रमकतेने सुरुवात केली. मात्र थोड्या वेळातच सिंधूने सेटमध्ये बरोबरी साधत आपलं आव्हान कायम राखलं. यानंतर काही क्षणापर्यंत सिंधूने पहिल्या सेटमध्ये ९-७ अशी आघाडी घेतली होती. मात्र आपला चांगला खेळ कायम राखणं सिंधूला जमलं नाही. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत यामागुचीने सामन्यात ११-१० अशी आघाडी घेतली. यानंतर यामागुचीने सिंधूला सामन्यात परतण्याची संधी न देता पहिला सेट २१-१४ या फरकाने खिशात घातला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधू यामागुचीला लढत देईल असा अंदाज सर्वांनी बांधला होता. मात्र जपानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने भारतीयांच्या मनसुब्यावर पाणी फिरवलं. दुसऱ्या सेटच्या सुरुवातीलाच यामागुचीने आपल्या खेळीने ६-० अशी आघाडी घेतली. यामागुचीच्या एकाही फटक्याचं उत्तर सिंधूच्या खेळीत दिसतं नव्हतं. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत यामागुचीने ११-२ अशी आघाडी घेत आपला मनसुबा स्पष्ट केला. यानंतर सिंधूचा सामन्यात आत्मविश्वास कमी होताना दिसला. एकामागोमाग एक क्षुल्लक चुका करत सिंधूने यामागुचीला पॉईंट बहाल केले. अखेर दुसरा सेट २१-९ अशा फरकाने जिंकत यामागुचीने अंतिम सामन्यात प्रवेश केला.