फ्रान्समध्ये कडाक्याच्या थंडीच्या वातावरणात मध्यरात्री १.३० वाजलेले असतानाही स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने दमदार कामगिरी करत विक्रमी १३व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्टेफानोस त्सित्सिपासनेही सहज विजयासह उपांत्य फेरी गाठली. महिलांमध्ये सोफिया केनिन आणि पेट्रो क्विटोव्हा यांनीही आगेकूच कायम राखली.

पुरुषांमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या लढती अपेक्षेप्रमाणे रंगतदार ठरल्या. नदालने आतापर्यंत एकही सेट न गमावता इटलीचा १९ वर्षीय युवा खेळाडू यानिक सिन्नेरला ७-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले. सिन्नेर प्रथमच फ्रेंच ग्रँडस्लॅममध्ये सहभागी झाला होता. पहिल्याच प्रयत्नात या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा तो नदालनंतर दुसराच खेळाडू ठरला. नदालसमोर उपांत्य फेरीत शुक्रवारी दिएगो श्वार्ट्झमनचे आव्हान असेल.  त्यामुळे श्वार्ट्झमनविरुद्ध पराभवाची परतफेड करण्याची संधी नदालकडे आहे. गेल्या महिन्यात लाल मातीवरील इटालियन खुल्या स्पर्धेत श्वार्ट्झमनने उपांत्यपूर्व फेरीत नदालला पराभवाचा धक्का दिला होता.

पाच तास आणि आठ मिनिटे रंगलेल्या रंगतदार लढतीत तिसऱ्या मानांकित डॉमिनिक थिमला श्वार्ट्झमनकडून ७-६, ५-७, ६-७, ७-६, ६-२ असा पराभव स्वीकारावा लागला. अर्जेटिनाच्या श्वार्ट्झमनने कारकीर्दीत प्रथमच जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असणाऱ्या खेळाडूला नमवण्याची कामगिरी केली. त्याची ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठण्याचीही ही पहिलीच वेळ ठरली. श्वार्ट्झमन लाल मातीवरील या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणारा अर्जेटिनाचा १०वा खेळाडू ठरला. २०१८ आणि २०१९ मधील फ्रेंच स्पर्धेचा उपविजेता थिमला पाचव्यांदा या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले.

पाचवा मानांकित स्टेफानोस त्सित्सिपासने रशियाच्या १३व्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हला ७-५, ६-२, ६-३ असे सहज नमवले. रुबलेव्हला फारशी संधीच या लढतीत त्सित्सिपासने दिली नाही. या स्पर्धेत प्रथमच त्सित्सिपासने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

पेट्रा क्विटोव्हा विरुद्ध सोफिया केनिन आणि इगा स्वियाटेक विरुद्ध नादिया पोडरेस्का अशा महिलांच्या उपांत्य लढती गुरुवारी होणार आहेत. दोन वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या क्विटोव्हाने जर्मनीच्या लॉरा सेगमंडचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. यंदाच्या स्पर्धेत क्विटोव्हाने एकही सेट न गमावता विजय मिळवण्याची कामगिरी के ली. अमेरिकेच्या केनिनने तिच्याच देशाच्या डॅनिल कॉलिन्स हिला ६-४, ४-६, ६-० असे पराभूत केले. या वर्षीच्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेत्या केनिनने प्रथमच या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली.

अन्य लढतीतून पोलंडची १९ वर्षीय इगा स्वियाटेकने कारकीर्दीत प्रथमच ग्रँडस्लॅमची उपांत्य फेरी गाठली. तिने पात्रता फेरीतून आलेल्या इटलीच्या मार्टिना ट्रेव्हिसनला ६-३, ६-१ असे सहज नमवले. १९६८ नंतर फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी स्वियाटेक ही पोलंडची पहिली महिला टेनिसपटू ठरली.

वेळ :  दुपारी २:३० पासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ आणि एचडी वाहिन्या.

नदालची वेळापत्रकावर टीका

पॅरिसमधील स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १:३० वाजेपर्यंत उपांत्यपूर्व फे रीत झुंज द्यावी लागल्यानंतर नदालने स्पर्धेच्या वेळापत्रकावर टीका केली. ‘‘मध्यरात्रीचे १:३० ही निश्चित लढत संपण्याची वेळ नाही. त्यातच कडाक्याच्या थंडीत खेळावे लागले. सध्याचे पॅरिसमधील कडाक्याच्या थंडीचे वातावरण ही टेनिस खेळण्यासाठी फारच आव्हानात्मक बाब आहे. त्याचा परिणाम खेळाडूंच्या तब्येतीवर होऊ शकतो. एकाच दिवशी एकाच कोर्टवर पाच लढतींचे आयोजन करणे चुकीचे आहे,’’ अशी टीका नदालने केली.