News Flash

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, नदाल विजयी

२१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या स्पेनच्या नदालने ब्रिटनच्या कॅमेरून नोरी याच्यावर ६-३, ६-३, ६-३ अशी सरशी साधली.

श्वीऑनटेक, केनिन, स्टीफन्सची घोडदौड; स्वितोलिना पराभूत

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच आणि २० ग्रँडस्लॅम जेतेपदांचा मानकरी राफेल नदाल यांनी शनिवारी विजयी घोडदौड कायम राखताना फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. गतविजेती इगा श्वीऑनटेक, अमेरिकेची सोफिया केनिन तसेच अमेरिकेची स्लोएन स्टीफन्स आणि ग्रीसचा स्टेफानोस त्सित्सिपास यांनी पुढील फेरीतील स्थान निश्चित केले.
अग्रमानांकित जोकोव्हिचने तिसऱ्या फेरीत रिकार्ड बेराकिन्सचा ६-१, ६-४, ६-१ असा तीन सेटमध्ये सहज धुव्वा उडवला. १ तास आणि ३२ मिनिटांत हा सामना जिंकणाऱ्या जोकोव्हिचने कारकीर्दीत एकूण १५व्यांदा फ्रेंच स्पर्धेची चौथी फेरी गाठली. आता सोमवारी होणाऱ्या लढतीत त्याच्यासमोर इटलीच्या लॉरेंझो मसेटीचे आव्हान असेल.
२१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या स्पेनच्या नदालने ब्रिटनच्या कॅमेरून नोरी याच्यावर ६-३, ६-३, ६-३ अशी सरशी साधली. नदालला चौथ्या फेरीत इटलीच्या यानिक सिन्नरचा सामना करावा लागेल. पाचव्या मानांकित त्सित्सिपासने ३१व्या मानांकित जॉन इस्नरचा ५-७, ६-३, ७-६ (७-३), ६-१ असा पराभव केला. पुढील फेरीत त्सित्सिपासची स्पेनच्या १२व्या मानांकित पाब्लो कॅरेनो बुस्टाशी गाठ पडेल. बुस्टाने स्टीव्ह जॉन्सनला ६-४, ६-४, ६-२ अशी धूळ चारली. अर्जेंटिनाच्या १०व्या मानांकित दिएगो श्वाट्र्झमनने फिलिप कोलस्क्रीबरवर ६-४, ६-२, ६-१ असे वर्चस्व गाजवले. श्वॉट्र्झमनचा पुढील फेरीत जॅन स्टर्फशी सामना होईल.
महिला एकेरीत पोलंडच्या आठव्या मानांकित श्वीऑनटेकने इस्टोनियाच्या अ‍ॅना कोन्टाविट हिचे आव्हान ७-६ (४), ६-० असे परतवून लावले. २० वर्षीय श्वीऑनटेकसमोर चौथ्या फेरीत युक्रेनच्या मार्ता कोस्तूकचे आव्हान असेल. चौथ्या मानांकित केनिनने अमेरिकेच्या जेसिका पेगुलावर ४-६, ६-१, ६-४ अशी मात केली. स्लोएन स्टीफन्सने कॅरोलिना मुचोव्हाला ६-३, ७-५ असे पराभूत केले. पाचव्या मानांकित एलिना स्वितोलिनाचे आव्हान मात्र संपुष्टात आले. बार्बोरा क्रेझिकोव्हाने स्वितोलिनाला ६-३, ६-२ असे सहज नमवले. स्वितोलिनाच्या पराभवामुळे आता फक्त केनिन ही पहिल्या पाच अग्रमानांकित खेळाडूंमधील एकमेव टेनिसपटू स्पर्धेत टिकून आहे. नाओमी ओसाका, अ‍ॅश्ले बार्टी, आर्यना साबालेंका यांचे आव्हान संपुष्टात आले आहे.
अमेरिकेच्या २३व्या मानांकित कोको गॉफ हिने आपल्याच देशाच्या जेनिफर ब्रॅडी हिच्याविरुद्ध ६-१, ०-० अशा स्थितीत विजय मिळवला. ब्रॅडीने दुखापतीमुळे माघार घेतल्याने गॉफला चौथ्या फेरीत प्रवेश मिळवता आला.

सिझिकोव्हाची सुटका
सामना निश्चितीप्रकरणी रशियाच्या याना सिझिकोव्हाला शुक्रवारी अटक करण्यात आली होती. परंतु शनिवारी जवळपास दोन तास चौकशी केल्यानंतर तिची सुटका करण्यात आली आहे. सिझिकोव्हाने आपल्यावरील आरोप खोटे असल्याचा दावा केला असला तरी याबाबत पुरावा मिळेपर्यंत तिला सातत्याने चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. सप्टेंबर २०२०मध्ये खेळासंदर्भात लाच स्वीकारणे तसेच गैरकृत्य केल्याच्या आरोपप्रकरणी याना हिला अटक करण्यात आली. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात फ्रान्सच्या पोलिसांनी सट्टेबाजी आणि सामना निश्चिती प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. तिने गतवर्षी फ्रेंच स्पर्धेत एक सामना निश्चित केल्याचा संशय आहे.
’ वेळ : दुपारी २.३० वा.
’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स सिलेक्ट १, २ व एचडी वाहिन्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2021 12:00 am

Web Title: french open tennis tournament novak djokovic rafael nadals akp 94
Next Stories
1 उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरण : भारतीय कुस्ती महासंघाला सुमितमुळे १६ लाखांचा दंड
2 ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा भारताबाहेर?
3 जागतिक अजिंक्यपदासाठी भारताचे पारडे जड – गावस्कर
Just Now!
X