News Flash

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हा पराभूत;हॅलेपची आगेकूच

जोकोव्हिच, झ्वेरेव्ह पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत

फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा : प्लिस्कोव्हा पराभूत;हॅलेपची आगेकूच
(संग्रहित छायाचित्र)

 

फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत गुरुवारी दुसऱ्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का बसला. तर अग्रमानांकित सिमोना हॅलेपने महिला एकेरीची तिसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीत नोव्हाक जोकोव्हिच आणि अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी पुढील फेरीतील स्थान निश्चित केले.

गतविजेती अ‍ॅश्ले बार्टी, जपानची नाओमी ओसाका आणि अमेरिकेची सेरेना विल्यम्स यांसारख्या मातब्बर खेळाडूंनी विविध कारणांनी माघार घेतल्यामुळे रोमानियाच्या हॅलेपला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०१८च्या विजेत्या हॅलेपनेसुद्धा जेतेपदाच्या दावेदाराला साजेशा खेळ करताना रोमानियाच्याच एरिना कॅमेलियाला ६-३, ६-४ अशी धूळ चारली. तिसऱ्या फेरीत २९ वर्षीय हॅलेपची २५वी मानांकित अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाशी गाठ पडणार आहे.

लॅटवियाच्या बिगरमानांकित येलेना ओस्तापेन्कोने धक्कादायक विजयाची नोंद करताना चेक प्रजासत्ताकच्या दुसऱ्या मानांकित प्लिस्कोव्हाला ६-४, ६-२ असे पराभूत केले. २०१७नंतर प्रथमच प्लिस्कोव्हाला या स्पर्धेची तिसरी फेरी गाठण्यात अपयश आले.  चौथ्या मानांकित सोफिया केनिनने अ‍ॅना बोगडॅनवर ३-६, ६-३, ६-२ अशी मात केली.

पुरुष एकेरीत गेल्या महिन्यात झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणाऱ्या झ्वेरेव्हला फ्रान्सच्या पियर हर्बटने चांगलेच झुंजवले. तीन तास आणि ११ मिनिटे रंगलेल्या या लढतीत सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने २-६, ६-४, ७-६ (७-५), ४-६, ६-४ असा विजय मिळवला. सॅचिनाटोने अर्जेटिंनाच्या जुआन लोंडेरोला ६-३, ६-२, ५-७, ६-२ असे हरवले. सर्बियाच्या अग्रमानांकित जोकोव्हिचने रिकार्डस बेरंकीसवर ६-१, ६-२, ६-२ असा सहज विजय मिळवला. जोकोव्हिचचा हा फ्रेंच स्पर्धेच्या कारकीर्दीतील एकूण ७०वा विजय ठरला. स्टीफानोस त्सित्सिपासने पाबलो क्युववर ६-१, ६-४, ६-२ अशी मात केली.

जपानच्या केई निशिकोरीला मात्र दुसऱ्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला. स्टीफानो ट्रॅविगलिआने निशिकोरीवर ६-४, २-६, ७-६ (९-७), ४-६, ६-२ असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. १७व्या मानांकित पाबलो कॅरोनो बुस्टाने गुएडो पेलावर ६-३, ६-२, ६-१ असे वर्चस्व गाजवले.

शरण सलामीलाच गारद

भारताचा दिविज शरण आणि त्याचा दक्षिण कोरियाचा सहकारी क्वोन सून-वू यांना पुरुष दुहेरीच्या पहिल्याच फेरीतून गाशा गुंडाळावा लागला. क्रोएशियाचा फ्रँको स्कुगर आणि ऑस्ट्रेलियाचा ऑस्टिन क्रॅजिक या १६व्या मानांकित जोडीने शरण आणि सून-वू यांचा ६-२, ४-६, ६-४ असा पराभव केला. दुहेरीतच कॅनडाच्या डेनिस शापोवालोव्हसह खेळणारा रोहन बोपण्णा हा भारताचा एकमेव टेनिसपटू आता या स्पर्धेत उरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 12:24 am

Web Title: french open tennis tournament pliskova defeated halep advance abn 97
Next Stories
1 किमिचच्या निर्णायक गोलमुळे बायर्न म्युनिकचे अष्टक
2 शालेय क्रीडा प्रशिक्षकांची चरितार्थ चालवण्यासाठी धडपड!
3 सारा तेंडुलकरशी अफेयरच्या चर्चा असणाऱ्या शुबमन गिलबद्दल सचिनचं ट्विट, म्हणाला…
Just Now!
X