अमेरिकेची चौथी मानांकित सोफिया केनिन आणि पोलंडची युवा टेनिसपटू इगा श्वीऑनटेक यांनी सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फे रीत मजल मारली. केनिन हिने चेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित पेट्रा क्विटोव्हाला तर श्वीऑनटेकने अर्जेटिनाच्या नादिया पोडोरोस्का हिला हरवत ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

महिलांची पहिली उपांत्य लढत मात्र अपेक्षेप्रमाणे रंगली नाही. जवळपास १ तास, १० मिनिटे रंगलेल्या या सामन्यात श्वीऑनटेकने ६-२, ६-१ अशी बाजी मारत अंतिम फेरीत प्रवेश केला.  ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती पोलंडची दुसरी महिला टेनिसपटू ठरली आहे. याआधी अग्निझ्स्का रॅडवान्स्का हिने २०१२ मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. १९ वर्षीय श्वीऑनटेकने अद्याप एकही सेट गमावलेला नसून तिला आता पहिल्यावहिल्या विजेतेपदासाठी चौथ्या मानांकित सोफिया केनिन हिच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

दुसऱ्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेत्या सोफिया केनिन हिला क्विटोव्हाकडून कडवा संघर्ष सहन करावा लागला तरी तिने ६-४, ७-५ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला. के निन हिने संतुलित टेनिसचे प्रदर्शन करत १० ब्रेकपॉइंट वाचवून दोन ग्रँडस्लॅम विजेत्या क्विटोव्हाविरुद्ध शानदार कामगिरी नोंदवली.

* वेळ : सायंकाळी ६.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ आणि एचडी वाहिन्या

दोन आठवडय़ांत संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवून मी आगेकूच केली आहे. आता अंतिम फेरी गाठल्याने मी खूश आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अविस्मरणीय असाच होता. त्यामुळे हा आनंद साजरा करून मी अंतिम फेरीसाठी सज्ज होणार आहे.

– सोफिया केनिन

माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. फ्रेंच स्पर्धेची इतकी चांगली सुरुवात करू शकेन, याचा विचारही केला नव्हता. माझ्या कामगिरीवर मीच आश्चर्यचकित झाले आहे.

– इगा श्वीऑनटेक

जोकोव्हिच उपांत्य फेरीत

अग्रमानांकित नोव्हाक जोकोव्हिचने मान आणि खांद्याच्या दुखापतीवर मात करत उपांत्यपूर्व फे रीत स्पेनच्या पाबलो कॅ रेनो बस्टा याचे आव्हान परतवून लावत उपांत्य फे रीत धडक मारली. सर्बियाच्या जोकोव्हिचला पहिल्या सेटमध्येच दुखापतीचा त्रास जाणवू लागला होता. मात्र वैद्यकीय मदत घेत त्याने १७व्या मानांकित कॅरेनो बस्टा याला ४-६, ६-२, ६-३, ६-४ असे हरवत १०व्यांदा फ्रेंच स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. लाल मातीवरील दुसरे आणि कारकीर्दीतील १८वे ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून तो अवघा दोन विजय दूर आहे.

गेल्या महिन्यात अमेरिकन खुल्या स्पर्धेतही जोकोव्हिच आणि कॅरेनो बस्टा आमनेसामने उभे होते. जोकोव्हिच पिछाडीवर पडल्यानंतर रागाच्या भरात त्याने रेषेवरील पंचांच्या गळ्यावर चेंडूने प्रहार केला होता. या प्रकारामुळे जोकोव्हिचची स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली होती. पण कॅरेनो बस्टाला जोकोव्हिचविरुद्ध पहिला विजय मिळवण्याची संधी त्यामुळे मिळाली होती. मात्र तो प्रकार विसरून जोकोव्हिचने त्यानंतर सलग १० सामने जिंकून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. आता शुक्रवारी रंगणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जोकोव्हिचला पाचव्या मानांकित स्टेफानोस त्सित्सिपास याच्याशी झुंज द्यावी लागेल. दुसऱ्या मानांकित राफेल नदालला उपांत्य फेरीत दिएगो श्वार्ट्झमनशी दोन हात करावे लागतील.

सामन्याच्या सुरुवातीलाच जोकोव्हिचला मानेचा आणि नंतर खांद्याचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे पहिल्या सेटमध्ये त्याने १६ चुका केल्या. पहिला सेट गमावल्यानंतर जोकोव्हिचने मात्र आपल्या दुखापतीवर मात करत बाजी मारली. दुसऱ्या सेटमध्ये दोनदा तर तिसऱ्या सेटमध्ये एकदा बस्टाची सव्‍‌र्हिस भेदत जोकोव्हिचने सामना जिंकला.

बस्टाची जोकोव्हिचवर टीका

पाबलो कॅरेनो बस्टा याने फ्रेंच स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात नोव्हाक जोकोव्हिचच्या खिलाडीवृत्तीवर टीका केली आहे. आरोग्यविषयक कोणत्याही समस्या जाणवत नसतानाही जोकोव्हिच जाणुनबुजून वैद्यकीय उपचार करवून घेत होता, असे टीकास्त्र कॅरेनो बस्टाने सोडले आहे. ‘‘संकटात असताना जोकोव्हिच प्रत्येक वेळी वैद्यकीय मदत मागत असतो. त्याची ही जुनीच खोड आहे. त्याने मला कमी लेखू नये,’’ असे कॅरेनो बस्टा म्हणाला.