अमेरिकेच्या सहाव्या मानांकित सेरेना विल्यम्सला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देताना बराच संघर्ष करावा लागला. अमेरिके च्या क्रिस्टी अ‍ॅनविरुद्धच्या लढतीत  दोन वेळा पिछाडीवर पडल्यानंतरही सेरेनाने जोमाने पुनरागमन करत दुसऱ्या फे रीत मजल मारली. सेरेनाचा विजय संघर्षपूर्ण असला तरी डॉमिनिक थिम, अलेक्झांडर झ्वेरेव्ह आणि पेट्रा क्विटोवा या मानांकितांनी दुसरी फेरी गाठली.

२०१७ नंतर एकही ग्रँडस्लॅम जिंकू न शकलेल्या सेरेनाचा २४व्या विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपदासाठी प्रयत्न सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या अमेरिकन खुल्या स्पर्धेतही सेरेनाला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला होता. कारकीर्दीत २३ ग्रँडस्लॅम आपल्या नावावर करणाऱ्या सेरेनाला फ्रेंच स्पर्धेच्या लाल मातीवर तिला तीन वेळाच जेतेपद पटकावता आले आहे. पहिला सेट सेरेनाला ७-६ अशी चुरस देऊन जिंकता आला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र सेरेनाने सर्व म्हणजे सहा गेम जिंकले. सेरेनाची बुधवारी दुसऱ्या फेरीत बल्गेरियाच्या स्वेताना पिरोन्कोवाशी लढत होणार आहे.

पुरुष एकेरीत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेतील विजेता ऑस्ट्रियाचा डॉमिनिक थिम आणि उपविजेता अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांनी विजयी सलामी दिली आहे. थिमच्या फ्रेंच स्पर्धेतील कामगिरीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. तिसऱ्या मानांकित थिमने क्रोएशियाच्या अनुभवी मारिन चिलिचला ६-४, ६-३, ६-३ असे सहज पराभूत केले. थिमला २०१८ आणि २०१९मध्ये या स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. सहाव्या मानांकित झ्वेरेव्हने ९१व्या मानांकित ऑस्ट्रियाच्या डेनिस नोव्हाकला ७-५, ६-२, ६-४ असे नमवले. दोन आठवडय़ांपूर्वी अमेरिकन स्पर्धेत झ्वेरेव्हला पाच सेटपर्यंत झुंज देऊनही थिमकडून अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्या सामन्यातील चुका फ्रेंच खुल्या स्पर्धेतील पहिल्या लढतीत सुधारल्याचे झ्वेरेव्हने दाखवले.

रविवारी पहिल्या दिवशी सर्वात लक्षवेधी लढत होती ती स्वित्र्झलडचा स्टॅनिस्लास वाविरका आणि अँडी मरे या दोन माजी ग्रॅँडस्लॅम विजेत्यांमध्ये. मात्र मरेकडूनही कोणतीही चुरस न मिळाल्याने वावरिंकाने ही लढत ६-१, ६-३, ६-२ अशी सहज जिंकली. ‘‘माजी अव्वल मानांकित असूनही दुखापतींचा फटका बसल्याने चांगला खेळ सध्या होत नाही. दुखापतींवर दोन वेळा शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. मात्र खेळ उंचावता येत नसल्याने किती खेळायचे याचा विचार करावा लागणार आहे. त्यातच माझे वयही आता ३३ आहे,’’ असे मरेने पराभवानंतर सांगितले.

महिलांमध्ये सातवी मानांकित चेक प्रजासत्ताकच्या पेट्रा क्विटोवाने विजयी सलामी दिली. दोन वेळा विम्बल्डन जिंकणाऱ्या क्विटोवाने फ्रान्सच्या ऑशेन डॉडिनला ६-३, ७-५ असे पराभूत केले. हॉलंडच्या पाचव्या मानांकित किकी बर्टेन्सने युक्रेनच्या कॅटरिना झ्ॉव्हॅट्स्कावर २-६, ६-२, ६-० अशी मात केली.

* वेळ : दुपारी २:३० पासून

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २ आणि एचडी आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट २ आणि एचडी

गतउपविजेती सलामीलाच गारद

फ्रेंच खुल्या स्पर्धेतील गतउपविजेती चेक प्रजासत्ताकची मार्केटा वॉँड्रोसोवाचा सलामीलाच पराभव झाला. पोलंडच्या इगा स्वियाटेकने वॉँड्रोसोवाचा ६-१, ६-२ असा पराभव केला. वॉँड्रोसोवा नुकत्याच झालेल्या इटालियन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत पोहचली होती. मात्र ती लय सलामीच्या लढतीत तिला राखता आली नाही. गेल्यावर्षी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिचा ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीकडून पराभव झाला होता.

बोपण्णा, शरण यांच्या आज लढती

भारताचे एकेरीत आव्हान नसले तरी दुहेरीत रोहन बोपण्णा आणि दिविज शरण हे त्यांच्या सहकाऱ्यांसह पुरुष दुहेरीत खेळणार आहेत. या दोघांच्याही लढती मंगळवारी होणार आहेत. शरण त्याचा दक्षिण कोरियाचा सहकारी काउन सून-वू याच्या साथीने खेळणार आहे. बोपण्णा कॅनडाच्या डेनिस शापोवालोवसह सहभागी होणार आहे.