टेनिस आणि बावनकशी सौंदर्य असा मिलाफ रंगलेल्या मारिया शारापोव्हा आणि इग्येुन बोऊचार्ड यांच्यात रंगलेल्या देखण्या मुकाबल्यात शारापोव्हाने बोऊचार्डवर विजय मिळवत फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सलग तिसऱ्यांदा धडक मारली. पुरुष गटात आपापल्या लढती जिंकत राफेल नदाल आणि अँडी मरे एकमेकांसमोर उपांत्य फेरीत उभे ठाकणार आहेत.
सातव्या मानांकित शारापोव्हाने बोऊचार्डवर ४-६, ७-५, ६-२ अशी मात केली. पहिला सेट जिंकत बोऊचार्डने चांगली सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये प्रत्येक गुणासाठी दोघींमध्ये जोरदार मुकाबला रंगला. दुसरा सेट जिंकत शारापोव्हाने बरोबरी केली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये अनुभवाला साजेसा खेळ करत बाजी मारली. अंतिम फेरीत शारापोव्हाचा मुकाबला सिमोना हालेप आणि आंद्रेआ पेटकोव्हिक यांच्यातील विजेतीशी होणार आहे. ‘बोऊचार्डने शानदार खेळ केला. मी विजय मिळवू शकले हे माझे भाग्य आहे’, अशा शब्दांत शारापोव्हाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
राफेल नदालने जिवलग मित्र डेव्हिड फेररवर ४-६, ६-४, ६-०, ६-१ अशी मात केली, तर अँडी मरेने फ्रान्सच्या गेइल मॉनफिल्सवर ६-४, ६-१, ४-६, १-६, ६-० असा संघर्षपूर्ण विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान पटकावले.
डेव्हिड फेररने पहिल्या सेटमध्ये फोरहँडच्या ताकदवान फटक्यांच्या जोरावर सरशी साधली. सावध सुरुवात करणाऱ्या नदालला स्थिरावण्यासाठी वेळ लागला आणि याचा पुरेपूर फायदा उठवत फेररने तुफानी आक्रमण केले. नदालला नमवत फेरर इतिहास घडवणार असे चित्र होते, मात्र पहिला सेट गमावलेल्या नदालने त्वेषाने खेळ करत फेररला कडवी टक्कर दिली. दमदार सव्‍‌र्हिस, अफलातून बॅकहँड आणि प्रदीर्घ रॅलीवर भर देत नदालने दुसरा सेट जिंकत बरोबरी केली. यानंतरच्या दोन सेटमध्ये नदालच्या झंझावातासमोर फेरर निष्प्रभ ठरला. तिसऱ्या सेटमध्ये नदालने फेररला एकही गुण मिळू दिला नाही तर चौथ्या सेटमध्ये केवळ एका गुणावर त्याला समाधान मानावे लागले. काही दिवसांपूर्वी झालेल्या रोम मास्टर्स स्पर्धेत फेररने नदालला नमवण्याची किमया केली होती. मात्र फ्रेंच स्पर्धेत नदालच्या साम्राज्याला तो धक्का पोहोचवू शकला नाही. या विजयासह जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या नदालने नवव्यांदा फ्रेंच स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोव्हिच यांची ग्रँड स्लॅम जेतेपदांवरची सद्दी मोडत अँडी मरेने विम्बल्डन जेतेपदाची कमाई केली. मात्र त्यानंतर त्याला असे यश मिळवता आलेले नाही. उपांत्यपूर्व फेरीतही स्थानिक खेळाडू मॉनफिल्सविरुद्ध मरेला संघर्ष करावा लागला. पहिले दोन सेट नावावर करत मरेने विजयाचा पाया रचला. मात्र यानंतर एकाग्रता गमावलेल्या मरेने भरपूर चुका केल्या. मॉनफिल्सने अचूक सव्‍‌र्हिसवर भर देत दोन सेट जिंकले. २-२ अशी बरोबरी झाल्याने मरेवरील दडपण वाढले. फेडररपाठोपाठ मरेलाही गाशा गुंडाळावा लागणार असे चित्र होते. मात्र पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये मरेने दिमाखदार खेळ करत उपांत्य फेरीत आगेकूच केली.