ऑलिम्पिक व विश्वचषक स्पर्धेत पदक मिळविण्याची क्षमता भारतीय हॉकीपटूंमध्ये आहे, मात्र वारंवार प्रशिक्षक बदलांमुळे भारतीय हॉकीचा ऱ्हास झाला आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी ऑलिम्पिकपटू व प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी सांगितले.
‘‘रिओ येथे पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी तयारी करण्याच्या दृष्टीने अजूनही वेळ गेलेली नाही. जर भारतीय खेळाडूंनी आगामी वर्षांत नियोजनबद्ध सराव केला व अगोदरचे दोष दूर करण्यावर भर दिला तर निश्चितच भारतीय खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवू शकतील,’’ असे वॉल्श म्हणाले.
पॉल व्हॅन अ‍ॅस यांना नुकतेच भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून दूर करण्यात आले आहे. त्याविषयी विचारले असता वॉल्श म्हणाले, ‘‘हॉकी इंडियाने ज्या प्रकारे त्यांना दूर केले ती पद्धत अतिशय चुकीची आहे. केवळ हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांना अवघ्या पाच महिन्यांत दूर करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय हॉकी व्यवस्थापनाबाबत परदेशात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. तसेच भारतीय संघातही निराशा निर्माण झाली आहे.’’
वॉल्श यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने गतवर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले तसेच रिओ ऑलिम्पिकचेही स्थानही निश्चित केले. भारतीय संघाविषयी वॉल्श पुढे म्हणाले, ‘‘आशियाई स्पर्धेसारखी नेत्रदीपक कामगिरी करण्याची क्षमता भारतीय संघात आहे. संघाचा कर्णधार सरदार सिंग याच्याकडे हा चमत्कार घडवून आणण्याची क्षमता आहे. भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्यासाठी खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा कसा घ्यायचा, हे भारतीय खेळाडूंनी सराव शिबिरात शिकले पाहिजे. अशक्य आव्हानही शक्य करून दाखवण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आहे.’’
गुरबाझ सिंगवर झालेल्या कारवाईविषयी खेद व्यक्त करताना वॉल्श म्हणाले, ‘‘गुरबाझ हा मधल्या फळीतील अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. विशेषत: ऑलिम्पिकसाठी तो अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे, मात्र त्याच्यावरील कारवाईमुळे आता त्याच्या जागी तितक्याच आत्मविश्वासाने खेळणारा खेळाडू तयार करण्याची आवश्यकता आहे.’’

‘‘भारतीय संघाबरोबर काम करताना मला खूप आनंद मिळाला. खेळाडू तसेच संघातील साहाय्यक प्रशिक्षकांशी माझा चांगला सुसंवाद झाला होता. हॉकी व्यवस्थापनाबरोबर झालेल्या मतभेदांमुळेच मला प्रशिक्षकपद सोडावे लागले. त्यास सर्वस्वी बत्रा यांचा स्वभाव व त्यांची कार्यपद्धत जबाबदार आहे. माझ्या कारकीर्दीतील ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आता संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी रोलँट ओल्टमन्स यांच्याकडे आहे. ते अतिशय अनुभवी प्रशिक्षक आहेत. खेळाडूंचाही त्यांच्याबरोबर सुसंवाद आहे. त्यामुळे ओल्टमन्स हे संघाची बांधणी चांगल्या रीतीने करतील अशी मला खात्री आहे,’’ असेही वॉल्श यांनी सांगितले.