भाग २ : कबड्डी
कबड्डी महाराष्ट्राच्या शहरांपासून ते गावागावांमध्ये पसरलेला खेळ. मागील वर्षी प्रो-कबड्डी लीगच्या आगमनामुळे या खेळाचे वातावरण आता सर्वत्र चांगल्या पद्धतीने रुजले आहे. कबड्डीपटू होण्याची खूप मोठी प्रेरणा या लीगमुळे निर्माण झाली आहे; परंतु मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्याव्यतिरिक्त कबड्डी प्रशिक्षण शिबिरांची अन्य शहरांमध्ये चर्चा नसल्याचेच दिसून येत आहे.
मुंबईत शिवशक्ती, शिवनेरी, ओम कबड्डी प्रबोधिनी, यंग प्रभादेवी, अमर भारत, गुड मॉर्निग क्लब यांची कबड्डीची शिबिरे चालतात. उपनगरात मी मुंबईकर, पोयसर जिमखाना आणि घाटकोपर क्रीडा केंद्र, तर ठाण्यात विठ्ठल क्रीडा मंडळ, होतकरू आणि मावळी मंडळ या संस्था कबड्डी प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतात.
ओम कबड्डी प्रबोधिनीच्या शिबिरात माया आक्रे-मेहेर, तारक राऊळ, जीवन पैलकर, सीताराम साळुंखे, वैशाली सावंत आदी दिग्गज खेळाडूंचे मार्गदर्शन लाभते. कबड्डीच्या ध्येयाने प्रेरित असलेली ही संस्था मॅटवरील कबड्डी कौशल्याच्या मार्गदर्शनाकडेही योग्य लक्ष देते. याशिवाय तंदुरुस्तीचे आधुनिक व्यायाम प्रकार शृंगार राऊळ या शिबिरात शिकवतो.
कबड्डी शिबीर कसे निवडाल?
*  शिबिराचे आयोजन कोण करत आहेत आणि कोणते खेळाडू मार्गदर्शन करणार आहेत, याची माहिती घ्यावी.
* सदर संस्थेचा किंवा मंडळाचा शिबिरे आयोजन करण्याचा आधीचा अनुभव पाहावा.
* शिबिरात दिग्गज खेळाडू नसेल, तर किमान तो चांगला मार्गदर्शक आहे, याची खात्री असावी.
* खेळाच्या नियमांची योग्य माहिती या शिबिरात करून दिली जायला हवी.
* आहाराचे योग्य ज्ञान या शिबिरातून करून दिले जायला हवे.
* खेळाचे प्राथमिक कौशल्य या शिबिरातून विकसित होणे आवश्यक आहे.
* पकड आणि क्षेत्रक्षण यांच्यातील कौशल्यांचे योग्य ज्ञान दिले जायला हवे.
*  या शिबिरात सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूमध्ये धर्य विकसित व्हायला हवे आहे.

शिबीर कोणती संस्था वा खेळाडू घेणार आहेत, याची माहिती आधी करून घ्यावी. त्यांचे नियमित मार्गदर्शन मिळायला हवे. प्रो-कबड्डी लीगमुळे मुले आणि पालक जागृतझाले आहेत, त्यामुळे शिबिराची निवड करताना त्यांना कठीण जाणार नाही. शारीरिक कौशल्य, कवायती यांचे ज्ञान याचप्रमाणे नियमांची इत्थंभूत माहिती करून देण्यावर या शिबिरांमध्ये भर देण्यात यावा.
– माया आक्रे-मेहेर, अर्जुन पुरस्कारविजेत्या कबड्डीपटू

शिबिरे ही मुळात कबड्डीची प्राथमिक आवड रूढ करण्यासाठी असतात. शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना त्याचा सराव व्हावा, हा मूळ हेतू असतो. या शिबिरांमध्ये तंदुरुस्तीच्या कसरती, आहार यांच्याकडेसुद्धा लक्ष दिले जायला हवे. भारतात अद्याप तरी कबड्डी अकादम्या निर्माण झालेल्या नाहीत; परंतु किमान शिबिरांमध्ये तरी चांगले मार्गदर्शन खेळाकडे वळणाऱ्या खेळाडूंना मिळायला हवे. दुर्दैवाने त्या क्षमतेच्या प्रशिक्षकांची संख्या भारतात अत्यंत कमी आहे.
– शांताराम जाधव, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू
संकलन : प्रशांत केणी