मैत्रीपूर्ण  फुटबॉल लढत

बर्लिन : लीऑन गोरेझ्का याने दुसऱ्या सत्रात केलेल्या गोलमुळे जोकिम ल्यू यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या माजी विश्वविजेत्या जर्मनीने पराभवाची नामुष्की टाळली आहे. बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात जर्मनीने सर्बियाविरुद्धची लढत १-१ अशी बरोबरीत सोडवली.

दोन आठवडय़ांपूर्वी जेरॉम बोटेंग, मॅट्स हमेल्स आणि थॉमस म्युलर या अनुभवी फुटबॉलपटूंना जर्मनीच्या संघातून वगळण्यात आल्यानंतर जोकिम ल्यू यांनी बुधवारच्या सामन्यापासून जर्मनीच्या फुटबॉलचे नवे पर्व सुरू होईल, अशी घोषणा केली होती. जर्मनीच्या युवा संघाने सुरुवातीपासूनच पासेसवर भर देत सामन्यावर नियंत्रण मिळवले. पण सर्बियाने लुका जोव्हिकच्या गोलमुळे १२व्या मिनिटालाच आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच जर्मनीने मार्को रेऊस आणि गोरेट्झ्का यांना मैदानावर उतरले. त्यानंतर सर्बियाचा गोलरक्षक मार्को मिट्रोव्हिचने दोन वेळा जर्मनीची आक्रमणे परतवून लावली. लेरॉय साने आणि इकाय गुंडोजेन यांना गोल करण्यात अपयश आल्यानंतर ६९व्या मिनिटाला गोरेझ्काने गोल करत जर्मनीला बरोबरी साधून दिली.

२०२०च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीतील जर्मनीचा पहिला सामना रविवारी बलाढय़ नेदरलँड्सशी रंगणार आहे.

वेल्सचा त्रिनिदादवर विजय

अतिरिक्त वेळेत बेन वुडबर्न याने केलेल्या गोलमुळे वेल्सने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात त्रिनिदाद आणि टोबॅगो संघावर १-० अशी मात केली. प्रशिक्षक रायन गिग्स यांनी आरोन रामसे, गॅरेथ बॅले आणि डेव्हिड ब्रूक्स यांसारख्या अव्वल खेळाडूंना या सामन्यासाठी वगळले होते. ९२व्या मिनिटाला विल वॉल्क्सने दिलेल्या क्रॉसवर बुडबर्नने सामन्यातील एकमेव गोल नोंदवला.