सीमेपलीकडून पाकिस्तानी सैन्याकडून होणाऱ्या कारवाया आणि अतिरेक्यांचे हल्ले यामुळे भारत-पाक देशांमध्ये सध्या क्रिकेटचे सामने होत नाहीयेत. मात्र दोन देशांमधील या बिघडलेल्या वातावरणाचा आपल्या मैत्रीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नसल्याचं मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने व्यक्त केलं आहे. सेंट मोरीत्झ आईस क्रिकेट स्पर्धेदरम्यान शाहिदने पीटीआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.

“भारत-पाकिस्तानमधील संबंधांचा परिणाम माझ्या आणि विराटच्या मैत्रीत कधीच होणार नाही. विराट हा एक चांगला माणूस आहे. माझ्याप्रमाणे तो ही आपल्या देशासाठी क्रिकेटचं प्रतिनिधीत्व करतो. माझ्या संस्थेसाठीही विराटने मला कित्येकवेळा सढळ हस्ते मदत केली होती.” शाहिद आफ्रिदीची संस्था पाकिस्तानात आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना स्वच्छ पाणी पुरवण्याचं काम करते.

अवश्य वाचा – गांगुलीनं सचिन तेंडुलकरशी केली विराट कोहलीची तुलना

माझ्यामते दोन देशांमधल्या खेळाडूंनी आपल्या वागणुकीतून एक चांगलं उदाहरण तयार केलं पाहिजे. याचा दोन देशांमधील बिघडलेले संबंध सुधारण्यास नक्कीच फायदा होईल. कित्येकदा मी आणि विराट फोनवरुन एकमेकांशी संवाद साधतो. नुकत्याच त्याच्या लग्नाबद्दल मी त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. पाकिस्तानवगळता भारत आणि ऑस्ट्रेलियातील चाहत्यांनीही मला तितकचं प्रेम दिलं आहे. शाहिद आफ्रिदी दोन देशांमधील बिघडलेल्या संबंधाबद्दल बोलत होता. शाहिद आफ्रिदी सध्या आईस क्रिकेट स्पर्धा खेळत आहे.

अवश्य वाचा – ‘व्हिव रिचर्ड्सइतकाच विराटही निर्दयी’