आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठीचा लिलाव नुकताच कोलकात्यात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडू या लिलावात सहभागी झाले होते. अनेक खेळाडूंना या लिलावात अनपेक्षितरित्या कोट्यवधींची बोली लागली तर काही खेळाडूंच्या पदरी निराशा पडली. गतविजेत्या मुंबई इंडियन्सनेही या लिलावात ६ खेळाडूंना संघात घेतलं, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस लिनचाही समावेश आहे. मात्र या लिलावात मुंबई इंडियन्सने दिग्वीजय देशमुख या तरुण खेळाडूवर विश्वास दाखवत २० लाखांच्या बोलीवर त्याला संघात घेतलं. मुंबई इंडियन्सने बोली लावल्यानंतर, दिग्वीजय देशमुख नेमका आहे तरी कोण याबद्दल चर्चा सुरु झाल्या होत्या.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

२१ वर्षीय दिग्वीजय देशमुख सध्या महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे राहणाऱ्या दिग्वीजयने गेल्या काही महिन्यांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. २०१९/२० च्या हंगामात दिग्वीजयने महाराष्ट्राकडून स्थानिक क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सय्यद मुश्ताक अली टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिग्वीजयने ९ बळी घेत स्वतःची निवड सार्थ ठरवली होती. यादरम्यान दिग्वीजयला दोनवेळा फलंदाजीचीही संधी मिळाली, ज्यात त्याने १९ धावा केल्या. यातील १२ धावा या षटकारांच्या जोरावर केल्या आहेत. याचसोबत रणजी क्रिकेटमध्येही दिग्वीजयने पदार्पणाच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीची चमक दाखवली होती. जम्मू-काश्मीरविरुद्धच्या सामन्यात दिग्वीजयने ६१ धावांत ६ बळी घेतले होते.

मात्र दिग्वीजय देशमुखची ओळख इतपर्यंतच नाहीये. याआधी दिग्वीजयने बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. सुशांतसिंह राजपूतच्या काय पो छे चित्रपटात दिग्वीजयने अली या छोट्या मुलाची भूमिका बजावली होती.

 

दिग्वीजय देशमुखसोबत मुंबई इंडियन्सने मोहसीन खान, प्रिन्स बलवंत राय सिंह या दोन खेळाडूंनाही संघात दाखल करुन घेतलं आहे. याव्यतिरीक्त ख्रिस लिन, नॅथन कुल्टर-नाईल आणि सौरभ तिवारी या खेळाडूंनाही मुंबई इंडियन्सने संघात संधी दिलेली आहे. त्यामुळे आगामी हंगामात गत-विजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी कशी राहते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : आता मी कुठे फलंदाजी करायची?? कर्णधार रोहितचा स्वतःच्याच संघाला टोला