दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिकेत २-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतर बीसीसीआय आता खडबडून जागं झालेलं आहे. यापुढे परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघ वन-डे आणि टी-२० मालिका प्रथम खेळणार आहे. यातून परदेशातील वातावरणाशी जुळवून घेण्याचा आणि खेळपट्ट्यांचा अंदाज बांधायला खेळाडूंना मदत होईल, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

या वर्षी भारतीय संघ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. या दौऱ्यांपासून बीसीसीआय हा बदल अंगिकारणार असल्याचं, बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी म्हटलं आहे. “संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या अहवालावर आम्ही चर्चा केली. या चर्चेत भारतीय खेळाडूंना वातावरणाशी जुळवून घेण्यात काही अडचणी येत असल्याचं समोर आलं. यासाठी आगामी इंग्लंड दौऱ्यात भारत पहिल्यांदा वन-डे आणि टी-२० मालिका खेळेल.” राहुल जोहरींनी बीसीसीआयची भूमिका स्पष्ट केली.

वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यासाठीही बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पहिले वन-डे सामन्यांची मालिका खेळण्याची विनंती केली होती, जी ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या प्रशासनाने मान्य केली आहे. आगामी काळात भारतीय संघाच्या परदेश दौऱ्याचं वेळापत्रक आखताना, या सर्व गोष्टींचा विचार केला जाणार असल्याचंही जोहरी म्हणाले.