क्रिकेट आणि बॅडमिंटनविश्वातील दिग्गजांची भेट
क्रिकेट विश्वातील सम्राट सचिन तेंडुलकर आणि बॅडमिंटनमधील राजा ली चोंग वेई या दोन दिग्गजांची आयबीएलच्या निमित्ताने भेट झाली. सलामीची लढत जिंकल्यानंतर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या ली याने सचिनची भेट घेतली. क्रिकेटसोबत अन्य खेळांची आवड असणारा सचिन आपली पत्नी अंजली तेंडुलकरच्या साथीने या सामन्याला आवर्जून उपस्थित होता. याशिवाय अजित आगरकर, पारस म्हांब्रे या क्रिकेटपटूंनीही बॅडमिंटनचा थरार अनुभवला.

ज्वाला राखीव; प्राजक्तावर विश्वास
बिनधास्त स्वभावासाठी प्रसिद्ध असलेली आणि क्रिश दिल्ली स्मॅशर्सची ‘आयकॉन’ खेळाडू ज्वाला गट्टा मुंबई मास्टर्स या मातब्बर संघाविरुद्धही राखीव खेळाडूंमध्येच पाहायला मिळाली. पुण्याविरुद्धच्या सलामीच्या लढतीत ज्वाला खेळली होती. मात्र हैदराबादविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत खांद्याच्या दुखापतीमुळे ती खेळू शकली नव्हती. ज्वालाच्या अनुपस्थितीत मुंबईकर प्राजक्ता सावंतने व्ही.दिजूच्या साथीने शानदार खेळ करत क्रिश दिल्ली स्मॅशर्सला विजय मिळवून दिला. मुंबई मास्टर्सविरुद्ध घरच्या मैदानावर प्राजक्ताला संधी देण्याचा निर्णय दिल्ली स्मॅशर्सने घेतला. मात्र ज्वालाचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या समर्थकांची मात्र या निर्णयामुळे निराशा झाली.

मुंबई मास्टर्सला पाठीराख्यांची साथ
घरच्या मैदानावर पहिल्यांदाच खेळणाऱ्या मुंबई मास्टर्स संघाला प्रोत्साहन देण्यासाठी ढोल, पिपाण्यांसह समर्थक हजर होते. सामन्याआधी सराव करणाऱ्या ली चोंग वेईला पाहण्यासाठी बऱ्याच समर्थकांनी गर्दी केली होती.

सणामुळे प्रेक्षकसंख्या घटली
रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा या सणांमुळे सोमवारच्या तुलनेत मंगळवारी प्रेक्षकसंख्या कमी झाल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी सायनाचा सामना नव्हता आणि ज्वालाच्या खेळण्याविषयी साशंकता असल्याने प्रेक्षक घटल्याचे चित्र स्पष्ट जाणवत होते.