नवीन वर्षाची सुरुवात विराट कोहलीच्या भारतीय संघाने धडाकेबाज पद्धतीने विजय मिळवत केली. श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० ने विजय मिळवला. यानंतर भारतीय संघासमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. १४ जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून या मालिकेत दोन्ही संघ ३ वन-डे सामने खेळतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमधले सामने म्हटलं की समोर येतो ते थरार आणि दोन्ही संघातील प्रमुख खेळाडूंमध्ये रंगणारं द्वंद्व. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९० च्या दशकात ऑस्ट्रेलियाच्या संघाचा दबदबा होता. मात्र कांगारुंचं वर्चस्व वेळोवेळी मोडून काढत भारतीय संघाने आपलं स्थान निर्माण केलं आहे. जाणून घेऊयात कांगारुंच्या मनात धडकी भरवणाऱ्या ५ भारतीय खेळाडूंबद्दल…

१) रवी शास्त्री – भारतीय संघाचे सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आपल्या काळात ऑस्ट्रेलियाला चांगलीच टक्कर दिली होती. १९८५ साली Benson Hedges World Series स्पर्धेत रवी शास्त्रींनी अष्टपैलू खेळ केला होता. १८२ धावा आणि ८ बळी अशी त्यांची या मालिकेतली कामगिरी होती. पाकिस्तानविरुद्ध अंतिम सामन्यात शास्त्रींनी नाबाद ६३ धावांची खेळी केली, ज्यामुळे भारताने या प्रतिष्ठीत मालिकेचं विजेतेपद मिळवलं होतं. या मालिकेनंतर रवी शास्त्रींना Audi 100 Sedan ही अलिशान गाडी बक्षीस म्हणून मिळाली होती.

२) सचिन तेंडुलकर – १९९१-९२ च्या दरम्यान भारतीय संघाने केलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात, भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघाने तिसरा कसोटी सामना रवी शास्त्रींचं द्विशतक आणि सचिनच्या १४८ धावांच्या शतकी खेळाच्या जोरावर अनिर्णित राखला. मात्र पर्थमधील अखेरच्या कसोटी सामन्यात सचिनने ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन तोफखान्यातील गोलंदाजांचा सामना करत केलेली खेळी ही विशेष समजली जाते. मर्व ह्यूज, क्रेग मॅकडरमॉट, पॉल रिफील या गोलंदाजांचा सामना करत सचिनने ११४ धावा केल्या. या खेळीनंतर सचिनचं नाव आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मानाने घ्यायला सुरुवात झाली.

३) युवराज सिंह – १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर युवराज सिंहची भारतीय सिनीअर संघात निवड झाली. २ हजार साली खेळवण्यात आलेल्या Knockout Cup स्पर्धेत युवराज भारतीय संघाकडून खेळत होता. ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पी यासारख्या दिग्गज ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा सामना करताना युवराजने ८० चेंडूत ८४ धावा केल्या. युवराजच्या या खेळीमुळे भारताने २६५ अशी धावसंख्या उभारली. याच खेळीमुळे युवराजचं भारतीय संघातलं स्थान पक्क झालं.

४) व्ही.व्ही.एस. लक्ष्मण – २००१ साली कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेला कसोटी सामना हा अनेक भारतीय क्रिकेट प्रेमींच्या स्मरणात कायम राहणार आहे. पहिल्या डावात भारतीय संघ १७१ धावांवर गारद झाला. यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतावर फॉलोऑन लादला…लक्ष्मण आणि द्रविड या जोडीने चौथ्या दिवशी ३७६ धावांची भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३८४ धावांचं आव्हान दिलं. यानंतर ऑस्ट्रेलियाला बाद करत भारताने कसोटी सामनाही जिंकला…लक्ष्मणने या सामन्यात २८१ तर द्रविडने १८० धावांची खेळी केली होती.

५) हरभजन सिंह – अनिल कुंबळेला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सौरव गांगुलीने युवा हरभजन सिंहला संधी दिली. हरभजन सिंहनेही आपल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलत, हॅटट्रीकसह १३ बळी घेतले. या मालिकेत हरभजन सिंहच्या नावावर ३२ बळी जमा होते. या अनोख्या कामगिरीसाठी हरभजनला सामनावीर आणि मालिकावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं होतं.

२०१९ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजय मिळवला होता. मात्र आताच्या ऑस्ट्रेलियन संघात बदल झाले आहेत. बंदीची शिक्षा भोगून स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिन वॉर्नर हे मुख्य फलंदाज संघात परतले आहेत. त्यातच लबूशेन हा फलंदाज सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. याव्यतिरीक्त पॅट कमिन्स, स्टार्क, हेजलवूड यासारखे तेज गोलंदाजही ऑस्ट्रेलियाच्या दिमतीला आहेत. त्यामुळे या मालिकेत कोणता भारतीय खेळाडू आपली छाप पाडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.