नवी दिल्ली : भारतीय टेबल टेनिस संघटनेने प्रथमच पूर्ण वेळ विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ  आणि कनिष्ठ संघांसाठी प्रत्येकी एक प्रशिक्षक नियुक्त करण्याचा हा निर्णय भारतीय टेबल टेनिसपटूंच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

भारतीय टेबल टेनिस संघटनेचे सरचिटणीस एम. पी. सिंग यांनी याबाबतची माहिती जाहीर केली. भारतीय क्रीडा प्राधिकरणकडून (साई) विदेशी प्रशिक्षक नियुक्तीला हिरवा कंदील दाखविण्यात आल्याने या मुद्दय़ाला आता गती देण्यात येणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या युवा टेबल टेनिसपटूंनी प्रभावी कामगिरी बजावल्यामुळेच ‘साई’कडून या प्रकरणात पुढे जाण्याचे संकेत दिले.

कनिष्ठ संघासाठीच्या प्रशिक्षकाची नियुक्ती पुढील महिन्यात करण्यात येणार आहे, तर वरिष्ठ संघाचे प्रशिक्षक मॅसिमो कॉस्टन्टीनी यांच्या वारसदाराची निवड डिसेंबर महिन्यात करण्यात येणार आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ६० वर्षांच्या इतिहासात प्रथमच पदक मिळवण्याची कामगिरी करून दाखवली होती.

भारताचे शरथ कमाल आणि मौमा दास या वरिष्ठ खेळाडूंनंतर त्याच दर्जाचे खेळाडू सातत्याने निर्माण करण्याच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शरथ हा गत दीड दशकापासून भारतीय संघाचे नेतृत्व प्रभावीपणे करीत आला आहे. मात्र तो आता ३६ वर्षांचा तर मौमा आता ३४ वर्षांची झालेली असून त्यांच्यानंतर तितकेच प्रभावी खेळाडू निर्माण होण्याची क्षमता खेळाडूंमध्ये आहे.

महिलांमध्ये मनिका बात्राने चमक दाखवून दिली आहे. त्यामुळेच भारतासाठी २०१८चे वर्ष हे भारतासाठी खूप फलदायी ठरले आहे.