News Flash

पायाभूत सुविधा मुबलक मिळाल्यास चांगले खेळाडू घडतील-गोपीचंद

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चांगली होते आहे. हा टप्पा गाठण्यासाठी खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली आहे.

| August 19, 2013 04:41 am

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चांगली होते आहे. हा टप्पा गाठण्यासाठी खेळाडूंनी प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र सायना, सिंधूसारखे चांगले खेळाडू घडण्यासाठी खेळाच्या पायाभूत सुविधा मुबलक प्रमाणावर उपलब्ध व्हायला हव्यात, असे मत भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. इंडियन बॅडमिंटन लीग (आयबीएल)च्या प्रशासकीय समितीचे सदस्य असलेले गोपीचंद स्पर्धेतील लढतींच्या निमित्ताने मुंबईत आले आहेत.
‘‘अनेक मुलांना बॅडमिंटन खेळण्याची इच्छा आहे. मात्र खेळण्यासाठी त्यांना घरानजीक बॅडमिंटन कोर्ट उपलब्ध होऊ शकेल याची शाश्वती नाही. चीनमधील गुआंगझाऊ या शहरात एक हजारहून अधिक बॅडमिंटन कोर्ट्स उपलब्ध आहेत. यापैकी बहुतांशी सार्वजनिक आहेत. जेणेकरून बॅडमिंटन खेळण्याची इच्छा असलेला खेळाडू तिथे जाऊन खेळू शकतो. मुंबई शहरात ५० बॅडमिंटन कोर्ट्स उपलब्ध आहेत. जिमखाना-क्लब्स प्रतिनिधींसाठी तिथे प्रवेश मर्यादित असतो. खेळाडू घडवण्यासाठी कोर्टची उपलब्धता मूलभूत आहे. त्यामुळे चांगले खेळाडू घडवायचे असतील तर कोर्ट्सची संख्या वाढायली हवी,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्पर्धा झाल्यावर हैदराबादमध्ये तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर दिल्लीतील सुविधांमध्ये अमूलाग्र सुधारणा झाली आहे. अशाच स्वरुपाचा विकास अन्य शहरांतही व्हायला हवा, अशी भूमिका गोपीचंद यांनी मांडली.
‘‘कोर्ट्ससाठी, अकादमीसाठी जागेची गरज असते. शाळा, क्रीडाक्षेत्रासाठी, रुग्णालयांसाठी सरकारी धोरणांप्रमाणे काही भूखंड राखीव ठेवण्यात येतो. मात्र या राखीव जागेचा उपयोग क्रीडा क्षेत्रासाठी होईल याची शास्वती नसते. क्रीडा क्षेत्र आणि स्थावर मालमत्ता यांची तुलनाच होऊ शकत नाही. जागेच्या बरोबरीने शटल्सची उपलब्धता आणि चांगले प्रशिक्षक असणेही तितकेच आवश्यक आहेत,’’ असे गोपीचंद यांनी सांगितले.

आयबीएलची चांगल्या पद्धतीने सुरुवात झाली आहे. नवी दिल्लीत दुसऱ्या दिवशी झालेल्या सामन्याला तीन हजार प्रेक्षक उपस्थित होते. लखनौ येथेही प्रेक्षकांचा प्रतिसाद हुरूप वाढवणारा होता. कुठल्याही नव्या उपक्रमाची सुरुवात चांगली होणे आवश्यक असते. आयबीएचा हा पहिलाच प्रयोग आहे. काही त्रुटी राहिल्या असतील, त्या सुधारण्याची संधी आहे,’’ असे त्यांनी पुढे
सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2013 4:41 am

Web Title: fundmental facilities can give good sports person gopichand
टॅग : Gopichand
Next Stories
1 ट्वेन्टी-२०ने क्रिकेटला अधिक मनोरंजक बनवले -सचिन
2 मँचेस्टरची धडाक्यात सुरुवात
3 बोल्ट, फ्रेझरच्या सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक
Just Now!
X