करोनामुळे अर्जेटिनातील फुटबॉल स्पर्धा स्थगित

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अर्जेटिनातील सर्व फुटबॉल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला. त्यामुळे पुढील महिन्यात अर्जेटिनामध्येच आयोजित करण्यात येणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अर्जेटिना आणि कोलंबिया १३ जूनपासून संयुक्तपणे कोपा अमेरिकाचे आयोजन करणार होते. मात्र शासनाविरुद्ध देशभरात चालू असलेल्या असंतोषामुळे तसेच करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर कोलंबियाने यजमानपद न भूषवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता अर्जेटिनामध्येही ३० मेपर्यंत फुटबॉल सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. स्थिती न सुधारल्यास आणखी काळासाठी सर्व प्रकारचे फुटबॉल सामने स्थगित करण्याचा इशारा अर्जेटिना फुटबॉल महासंघाने दिला आहे.

‘‘राष्ट्रपती अल्बटरे फर्नाडेझ यांनी लागू केलेल्या टाळेबंदीच्या पाश्र्वभूमीवर ३० मेपर्यंत अर्जेटिनामधील सर्व फुटबॉल सामने स्थगित करण्यात आले आहेत. कोपा अमेरिका स्पर्धेचे एकटय़ाने आयोजन करण्यासाठी अर्जेटिना तयार आहे. मात्र देशातील स्थितीचा आढावा घेऊन त्या स्पर्धेविषयी निर्णय घेतला जाईल,’’ असे अर्जेटिना फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. कोपा अमेरिकासाठी १० संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून २०१९ मध्ये झालेल्या अखेरच्या स्पर्धेत ब्राझीलने जेतेपद मिळवले होते.

दर दोन वर्षांनी फिफा विश्वचषक?

जीनिव्हा : दर चार वर्षांनी पुरुषांची फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा खेळवण्यात येते, परंतु आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) शनिवारी झालेल्या बैठकीदरम्यान दोन वर्षांनी विश्वचषक खेळवण्याचा प्रस्ताव ‘फिफा’चे अध्यक्ष जिआनी इन्फान्टिनो यांनी मांडला. ‘फिफा’चे पदाधिकारी आणि चाहत्यांच्या मताचा आढावा घेऊन याविषयी लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. करोना साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून झालेले नुकसान आणि क्लबस्तरीय स्पर्धाच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय सामन्यांचे महत्त्व वाढवण्याच्या दृष्टीने इन्फान्टिनो यांनी हा प्रस्ताव सादर केला आहे. २०२२ मध्ये कतार येथे पुढील विश्वचषक होणार आहे.