सध्या तामिळनाडू प्रिमियर लीगचे सामने सुरु आहेत. स्थानिक खेळाडूंना मोठ्या स्तरावरील संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये अनेक खेळाडूंनी आपल्या खेळाने प्रेक्षकांचे आणि क्रिकेट तज्ज्ञांचे लक्ष्य वेधून घेतले आहे. या स्पर्धेमधून या पूर्वीही अनेक नवोदीत खेळाडू समोर आले आहेत आणि त्यांनी आयपीएलमध्ये आपल्या कामगिरीने नाव कमावले आहे. सध्या या स्पर्धेतील एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे. हे नाव म्हणजे जी. पेरियास्वामी. आपल्या गोलंदाजीच्या शैलीमुळे चर्चेत असलेला पेरियास्वामी गोलंदाजी करताना अगदी श्रीलंकेच्या मालिंगाप्रमाणे चेंडू टाकतो. विशेष म्हणजे पेरियास्वामीने या अनोख्या शैलीत टाकलेला यॉर्कर पाहून बुमराहचा यॉर्कर आठवतो असं नेटकऱ्यांच म्हणणं आहे.

पेरियास्वामी यंदाच्या मोसमामध्ये चेपॉक सुपर गिल्लीज या संघाकडून खेळत असून डिंडीगुल ड्रॅगन्स संघाविरोधात तो पहिल्यांदा मैदानात उतरल्याचे पहायला मिळाले. २५ वर्षीय पेरियास्वामी पंचांच्या अगदी हात नेत जवळून चेंडू फेकतो. त्याच्या आगळ्यावेगळ्या शैलीमुळे गोलंदाजांना त्याचे चेंडू समजण्यास कठीण जाते. एक विशेष गोष्ट म्हणजे पेरियास्वामीला एका डोळ्याने दिसत नाही. मात्र त्याच्या कामगिरीवर याचा परिणाम होताना दिसत नाही. तो एक उत्तम गोलंदाज असण्याबरोबरच चांगला क्षेत्ररक्षकही आहे. चेंडूच्या वेगावर पेरियास्वामीचे भन्नाट नियंत्रण आहे. तो धिम्या गतीचे तसेच जलद चेंडूही अगदी उत्तमप्रकारे टाकतो. यंदाच्या मोसमामध्ये पेरियास्वामीने ५.७३ च्या सरासरीने चार सामन्यांमध्ये ७ बळी घेतले आहेत.

पेरियास्वामीने कराईकुडी कलाई या संघाविरोधातील सामन्यामध्ये तीन षटकांमध्ये ९ धावा देत २ बळी घेतले होते. पेरियास्वामीच्या गोलंदाजीचे व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर चांगलेच व्हायरल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्याची गोलंदाजी पाहून लवकरच तो मोठ्या स्तरावरील क्रिकेट स्पर्धांमध्ये झळकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लवकरच पेरियास्वामीआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७ च्या स्पर्धेमध्ये तूती पेट्रियट्स संघाकडून खेळणाऱ्या अतिशयराज डेविडसन या गोलंदाजाची शैली मलिंगासारखी असल्याने त्याचे नाव चर्चेत आले होते. डेविडसनने २०१७ सालच्या स्पर्धेमध्ये १५ बळी घेतले होते.