शरथ, मनिका, सुतिर्थाचे आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या ‘आयटीटीएफ’ जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत जी. साथियान या एकमेव भारतीय खेळाडूचे आव्हान शिल्लक आहे. त्याने रोमानियाच्या ख्रिस्तियन प्लीटीचा ११-५, ११-९, ६-११, ११-७, ११-६ असा पराभव केला.

जागतिक क्रमवारीत २८व्या स्थानावर असलेल्या साथियानसमोर पुढील फेरीत ब्राझीलच्या ह्युगो काल्डेरानोचे आव्हान असेल. पहिल्या फेरीत बेल्जियमच्या रॉबिन डेव्हॉसचा ४-० असा पाडाव करणाऱ्या साथियानला जागतिक क्रमवारीत १३१व्या स्थानावर असलेल्या प्लीटीला नामोहरम करणे जड गेले नाही. साथीयनने पहिले दोन गेम जिंकल्यानंतर तिसऱ्या गेममध्ये प्लीटीने मुसंडी मारली. परंतु चौथा आणि पाचवा गेम जिंकत साथियानने सामन्यावर ३५ मिनिटांत प्रभुत्व मिळवले.

जागतिक क्रमवारीत ३६व्या स्थानावर असलेल्या शरथ कमालचे आव्हान मात्र संपुष्टात आले. क्रोएशियाच्या टॉमिस्लाव्ह पुकारने त्याचा ११-९, १२-१०, ८-११, ११-४, ११-९ असा पराभव केला. मानव ठक्करलाही आगेकूच करण्यात अपयश आले आहे. ऑस्ट्रियाच्या रॉबर्ट गाडरेसने त्याचा ११-१३, ११-६, ८-११, ३-११, ११-२, १२-१०, ११-६ असा पराभव केला.

महिलांमध्ये मनिका बात्रा आणि सुतिर्था मुखर्जी यांची वाटचालसुद्धा खंडित झाली आहे. तैपेईच्या झू-यू चेनने मनिकाला ११-२, ११-८, ७-११, ११-७, ११-९ असे नमवले, तर प्युटरे रिकोच्या अ‍ॅड्रियन डायझने सुतिर्थाचा ४-११, ११-८, ७-११, ११-५, ११-३, ११-९ असा पराभव केला.