22 September 2020

News Flash

जागतिक नेमबाजी स्पर्धामधील बदल अयोग्य – गगन नारंग

नेमबाजीतील या प्रस्तावित बदलाला खेळाडूंमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे.

| February 9, 2017 03:16 am

नेमबाजीमधील काही प्रकारात २०२० च्या ऑलिम्पिकपासून पुरुष दुहेरीऐवजी मिश्रदुहेरी विभागाचा समावेश करण्याची शिफारस आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाच्या खेळाडू समितीने सुचविली आहे. पण हा बदल खेळाडूंच्या दृष्टीने अयोग्य असून त्यामुळे समानता राहणार नाही, असे ऑलिम्पिक कांस्यविजेता नेमबाज गगन नारंगने सांगितले.

डबलट्रॅपच्या पुरुष दुहेरीऐवजी मिश्रदुहेरी, पुरुषांचा ५० मीटर प्रोनऐवजी मिश्रदुहेरी एअर रायफल तसेच पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूलऐवजी मिश्रदुहेरी एअरपिस्तूल असे बदल सुचविण्यात आले आहेत.

नेमबाजीतील या प्रस्तावित बदलाला खेळाडूंमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्राने मात्र या बदलांची शिफारस योग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

नारंग याने या बदलांना विरोध करीत सांगितले की, ‘या बदलांमुळे पुरुष व महिलांच्या कामगिरीवर अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रोन हा प्रकार जागतिक स्तरावर खूप लोकप्रिय प्रकार आहे. जर हा प्रकार वगळला तर अनेक खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी मिळणार नाही. त्याचबरोबर नेमबाजी साहित्याचे उत्पादन करणाऱ्या उद्योजकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

ऑलिम्पिकमध्ये सध्या नेमबाजीत पुरुषांकरिता नऊ तर महिलांकरिता सहा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. पुरुष व महिला यांच्यात समानता आणण्यासाठी प्रस्तावित बदल सुचविण्यात आले आहेत.’

नारंग पुढे म्हणाला की, ‘२०१२ मध्ये लंडन येथील ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफलमध्ये मला कांस्यपदक मिळाले होते. त्यानंतर दुखपतींमुळे मी या क्रीडा प्रकारात भाग घेतला नव्हता. मात्र पुढच्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा त्या क्रीडा प्रकाराकरिता मी नशीब आजमावणार आहे. नवी दिल्ली येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत मात्र मी फक्त ५० मीटर प्रोन प्रकारात भाग घेत आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर या स्पर्धेत पदक मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील.’

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 3:16 am

Web Title: gagan narang
Next Stories
1 अजिंक्यचे योगदान नाकारून चालणार नाही – कोहली
2 भारताचा थायलंडवर दिमाखदार विजय
3 बांगलादेशविरुद्धची एकमेव कसोटी आजपासून
Just Now!
X