ऑलिम्पिक पदकविजेता गगन नारंगने रिओ ऑलिम्पिकवारीचे तिकीट पक्के केले. फोर्ट बेनिंग, अमेरिका येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषकात गगनने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. या पदकासह गगनचा रिओमार्ग सुकर झाला.
२०१२ लंडन ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक पटकावणाऱ्या गगगने विश्वचषकात १८५.८ गुणांसह तिसरे स्थान मिळवले. अमेरिकेच्या मायकेल मॅकफिलने २०८.८ गुणांसह सुवर्ण तर नॉर्वेच्या ओल ख्रिस्तियन ब्रायनने २०६.३ गुणांसह रौप्यपदक पटकावले.
१० मीटर एअर रायफल प्रकारात मात्र गगन तसेच अभिनव बिंद्राला अंतिम फेरी गाठता आली नव्हती. मात्र या अपयशाने खचून न जाता गगनने ५० मीटर रायफल प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर कब्जा केला.
याआधी अपूर्वी चंडेला, जितू राय रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले होते. अपूर्वीने चांगवोन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात १० मीटर एअर रायफल प्रकारात कांस्यपदक मिळवले होते. जितू रायने गेल्यावर्षी ग्रॅनडा, स्पेन येथे झालेल्या नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत ५० मीटर फ्री पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. प्रत्येक देशाला नेमबाजीतील १५ विविध उपप्रकार मिळून ३० जागा उपलब्ध आहेत.