मुंबई : महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक बिनविरोधपणे पार पाडण्यासाठी कार्याध्यक्षपदावर दावा करणाऱ्या गजानन कीर्तिकर यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वच उमेदवारांनी आपले माघारीचे पत्रसुद्धा सुकाणू समितीला दिल्यामुळे कीर्तिकरांचा अपवाद हा अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

राज्य कबड्डी संघटनेच्या २५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीत १६ जागांसाठी ७१ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. मात्र कीर्तिकर यांनी आपले माघारीचे इच्छापत्र अद्याप सुकाणू समितीला दिलेले नाही. कार्याध्यक्षपदासाठी कीर्तिकर यांच्यासह किशोर पाटील, दत्ता पाथ्रीकर आणि आस्वाद पाटील हे प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे कीर्तिकर यांनी माघार घ्यावी, असे प्रयत्न सुरू आहेत. कारण पदांचे समीकरण साधताना आस्वाद पाटील यांना कार्याध्यक्ष किंवा सरकार्यवाह या दोनपैकी एक पद मिळणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे कीर्तिकर यांनी माघार घेतली नाही, तर त्यांना पाथ्रीकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढावी लागण्याची शक्यता आहे. मात्र या परिस्थितीत शिवसेनेसह महाराष्ट्रातील अन्य मतदारांचे पाठबळ त्यांच्यासाठी महत्त्वाचे ठरेल.