* निवड समितीने ‘दिल्ली’ राखली
* फिरकी गोलंदाज हरभजनचे पुनरागमन
* वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ निवडताना संदीप पाटील यांच्या निवड समितीने दिल्लीचा कोटा कायम ठेवण्यावरच भर दिल्याचे दिसते. एकीकडे अपयशी गौतम गंभीरला वगळून कडक पाऊल उचलले खरे, पण सलामीवीर म्हणून बरेच पर्याय उपलब्ध असताना निवड समितीने मात्र दिल्लीकर शिखर धवनलाच प्राधान्य दिले. अनुभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीच्या संचिताच्या जोरावर ऑफ-स्पिनर हरभजन सिंगचे संघात पुनरागमन झाले असून, एकदिवसीय सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. इराणी करंडक सामन्यातील दोन्ही डावांत नेत्रदीपक खेळी साकारून सहाव्या स्थानासाठी प्रबळ दावेदारी करणाऱ्या सुरेश रैनाच्या पदरी मात्र निराशा पडली.
गंभीर गेला, धवन आला
सातत्याने अपयशी ठरणारा सलामीवीर गौतम गंभीरला वगळत निवड समितीने ‘कामगिरी दाखवा आणि संघात जागा मिळवा’, हे दाखवून दिले खरे. पण याचवेळी त्याच्या जागी धवनची केलेली निवड आकलनापलीकडची होती. सलामीवीरासाठी यावेळी बरीच नावे चर्चेत होती, पण त्यांच्याऐवजी धवनची निवड झाल्याने निवड समितीने दिल्लीचा गड राखल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. धवनने यंदाच्या मोसमात १० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ५५.५३ च्या सरासरीने ८३३ धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या वसिम जाफर, जीवनज्योत सिंग, सी.एम. गौतम या सलामीवीरांना संधी का देण्यात आली नाही, हे कोडे न उलगडणारे आहे.
हरभजनचे पुनरागमन
अनुभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची आतापर्यंतची दमदार कामगिरी, फक्त याच बळावर फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे. यंदाच्या रणजी हंगामात हरभजनला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाची पायरी समजल्या जाणाऱ्या इराणी करंडक सामन्यात त्याने दोन्ही डावांत मिळून पाच बळी मिळवले. सध्याचा त्याचा फॉर्म आणि दिशाहीन गोलंदाजी पाहता फक्त पूर्वपुण्याईवरच त्याची संघात निवड झाल्याचे दिसते.
रैना बरसे, तो भी तरसे
सुरेश रैनाने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता आणि इराणी करंडकात शतक झळकावत त्याने संघाचे दार ठोठावले होते. पण निवड समितीने मात्र त्याच्यासाठी यावेळी तरी दरवाजे बंद ठेवण्याचाच निर्णय घेतला. धावा करत संघात येण्यासाठी तरसलेल्या रैनाच्या पदरी त्यामुळे यावेळी निराशाच पडली.
भुवनेश्वरवर विश्वास इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरी करणारा युवा गोलंदाज भुवनेश्वर कुमारला कसोटी संघात स्थान देत त्याच्यावर निवड समितीने विश्वास ठेवला आहे. पण भारतीय खेळपट्टय़ा आणि संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज पाहता त्याला अंतिम संघात संधी मिळेल का, याची मात्र साशंकता आहे.
जाफरचं काय चुकतंय?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडताना निवड समिती सलामीवीराच्या शोधात होती. याप्रसंगी बरीच वर्षे सातत्यपूर्ण धावा करणारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव गाठीशी असणारा आणि तांत्रिकदृष्टय़ा भारतातील सर्वोत्तम सलामीवीर असलेला वसिम जाफर हा संदीप पाटील यांच्या निवड समितीचे लक्ष कसे वेधू शकला नाही, हे न उलगडणारे कोडे आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील एकाही सामन्यात भारताला चांगली सलामी मिळाली नाही आणि हेदेखील पराभवाचे एक प्रमुख कारण ठरले होते, असे असताना अनुभवी जाफरला संघात घ्यायला हवे होते. जाफरने यंदाच्या रणजी मोसमात ७ सामन्यांमध्ये ७५.९० च्या सरासरीने ८३५ धावा केल्या आहेत. तर इराणी करंडकात त्याने पहिल्या डावात ८० आणि दुसऱ्या डावात नाबाद १०१ धावांची खेळी साकारली. तो चांगल्या फॉर्मात असताना फक्त वयाकडे बोट दाखवून निवड समितीने त्याचा विचार केला नसेल, तर फॉर्मात नसलेला वीरेंद्र सेहवाग कसा काय संघात बसू शकतो, या प्रश्नाचे उत्तर निवड समितीने द्यायला हवे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, प्रग्यान ओझा, हरभजन सिंग, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि अशोक दिंडा.