पाकिस्तानचा माजी कसोटीपटू शाहिद आफ्रिदीला करोनाची लागण झाली आहे. आफ्रिदीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती आपल्या चाहत्यांनी दिली. आफ्रिदी गेल्या काही महिन्यात आपल्या संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तानात अनेक गरजू व्यक्तींना अन्नदानाचं काम करत होता.

गेल्या काही दिवसांपासून आफ्रिदी आपल्या भारतविरोधी वक्तव्यांमुळेही चांगलाच चर्चेत राहिला होता. त्याच्या प्रत्येक वक्तव्याला भारताकडून माजी खेळाडू आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीरने सडेतोड प्रत्युत्तर दिलं. या दोन्ही खेळाडूंमध्ये अनेकदा सोशल मीडियावर शाब्दिक द्वंद्व सुरु असतं. मात्र आफ्रिदीला करोनाची लागण झाल्यानंतर गंभीरने त्याने यामधून लवकरात लवकर बरं व्हावं असं म्हटलंय. “कोणालाही या विषाणूची लागण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. माझ्यात आणि आफ्रिदीमध्ये अनेक राजकीय मतभेद असले तरीही त्याने यामधून लवकरात लवकर बरं व्हावं असं मला वाटतंय. आफ्रिदीपेक्षाही माझ्या देशातील प्रत्येक करोनाबाधित रुग्णाने यामधून बरं व्हावं अशी माझी इच्छा आहे.” गंभीर ‘सलाम क्रिकेट २०२०’ या कार्यक्रमात बोलत होता.

पाकिस्तानमध्ये करोनाचे एक लाख ३२ हजारहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर आतापर्यंत तेथे अडीच हजारहून अधिक जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. ५० हजार पाकिस्तानी नागरिक करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत.