18 January 2018

News Flash

भारताचा ‘गंभीर’सराव

भारतीय कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शानदार शतक झळकावत कसोटी स्थानासाठी आपला दावा मजबूत केला. गंभीरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय अ

पीटीआय, चेन्नई | Updated: February 17, 2013 3:33 AM

भारतीय कसोटी संघातून डच्चू मिळालेल्या गौतम गंभीरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात शानदार शतक झळकावत कसोटी स्थानासाठी आपला दावा मजबूत केला. गंभीरच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय अ संघाने दिवसअखेर ३३८ धावांची मजल मारली.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. गंभीर आणि नुकत्याच संपलेल्या रणजी हंगामात सर्वाधिक धावा पटकावणाऱ्या जीवनज्योत सिंगने ६७ धावांची सलामी दिली. मात्र ७२ चेंडूत २४ धावांची संथ खेळी करणाऱ्या जीवनज्योतला झेव्हियर डोहर्टीने बाद करत ही जोडी फोडली. जीवनज्योतच्या जागी मैदानात उतरलेल्या रोहितने गंभीरसह दुसऱ्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी करत डावाला आकार दिला.
ऑस्ट्रेलियाच्या अनुनभवी फिरकी आक्रमणाचा खरपूस समाचार घेत गंभीरने शतकी खेळी साकारली. गेले वर्षभर कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी झगडणाऱ्या गंभीरने १३ चौकार आणि ३ षटकारांसह ११२ धावांची खेळी करत आपण धावा करणे विसरलो नसल्याचे सिद्ध केले. गंभीरची आगेकूच मॉइझेस हेन्रिक्सने थांबवली.
शेष भारतविरुद्धच्या सामन्यात मुंबईतर्फे खेळताना सुमार प्रदर्शन करणाऱ्या रोहित शर्माने ७७ धावांची खेळी करत आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवली. त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले. गंभीर बाद झाल्यानंतर रोहित आणि मनोज तिवारी यांनी एकत्र येत तिसऱ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. शतकाकडे कूच करणाऱ्या रोहितला डोहर्टीने बाद केले. रणजी हंगामात दिमाखदार अष्टपैलू खेळ करणारा अभिषेक नायर फार काळ टिकला नाही. डोहर्टीने ४ धावांवर त्याला कोवानकडे झेल देण्यास भाग पाडले. तिवारीने यानंतर मुरलीधरन गौतमच्या साथीने पाचव्या विकेटसाठी नाबाद ६६ धावांची भागीदारी करत संघाला तीनशेचा टप्पा ओलांडून दिला. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा मनोज तिवारी दिवसअखेर ७७ धावांवर खेळत आहे तर गौतम ३४ धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियातर्फे ३ विकेट टिपणारा झेव्हियर डोहर्टी यशस्वी गोलंदाज ठरला. या कामगिरीसह डोहर्टीने पहिल्या कसोटीसाठी अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यासाठी आपली दावेदारी बळकट केली.

First Published on February 17, 2013 3:33 am

Web Title: gambhir ready for comeback
टॅग Cricket,Gambhir,Sports
  1. No Comments.