भारताचा माजी क्रिकेटपटू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर याने आपले खासदार म्हणून दोन वर्षांचे वेतन करोनासाठी लढणाऱ्या पंतप्रधान सहायता निधीला दिले आहे.

पूर्व दिल्लीमधून भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून निवडून आलेला गंभीर याने समाज माध्यमांवरून ही घोषणा केली असून त्याने लोकांना देणगी देण्याचे आवाहनही केले आहे. ‘‘आपला देश आपल्यासाठी काय करत आहे, हा प्रश्न नेहमीच विचारत असतात. पण तुम्ही देशासाठी काय करता, हा खरा प्रश्न आहे. मी माझा दोन महिन्यांचा पगार पंतप्रधान सहायता निधीला देत आहे. तुम्हीही याबाबतीत पुढाकार घ्या,’’ असे गंभीरने म्हटले आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनीही ४ लाख रुपयांची मदत केली आहे. त्याने दोन लाख रुपये पंतप्रधान सहायता निधीला तर दीड लाख रुपये तेलंगणा मुख्यमंत्री निधीला आणि ५० हजार रुपये सेक्रेटरी कँटिन मंडळाला दिले आहेत.

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती तसेच जागतिक स्पर्धामध्ये अनेक पदके मिळवणारी नेमबाज अपूर्वी चंडेला हिनेही मदतीसाठी पुढे हात केला असून तिने करोनाविरुद्धच्या लढय़ासाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने १० लाख रुपयांची मदत पंतप्रधान सहायता निधीला दिली आहे.