लिखित स्वरूपात बाजू मांडण्याचे लवाद अधिकाऱ्यांचे आदेश

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीकडून दोन पदे सांभाळताना हितसंबंध जोपासले जात असल्याच्या याचिकेबाबत दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या बाजू लिखित स्वरूपात मांडण्याचे आदेश लवाद अधिकारी डी. के. जैन यांनी दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) गांगुलीची पाठराखण करण्यात येत असून हितसंबंधाचा वाद हा सोडवता येणे शक्य असल्याचे म्हटले आहे.

भासवती शांतुआ, अभिजीत मुखर्जी आणि रणजीत सील या बंगालच्या तीन चाहत्यांनी गांगुलीविरोधात दावा केला आहे. बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष भूषवताना गांगुली दिल्ली कॅपिटल्सच्या सल्लागाराच्या भूमिकेत कार्यरत आहे. त्यामुळे गांगुलीकडून हितसंबंध जोपासले जात असल्याबाबत या तिघांनी आक्षेप घेत ‘बीसीसीआय’कडे तक्रार केल्यानंतर त्यांनी लवाद अधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपवले आहे. त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर दोन्ही पक्षकारांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले असून, त्यानंतरच ते निकाल जाहीर करणार आहेत.

वाद सोडवणे शक्य; ‘बीसीसीआय’चा दावा

गांगुलीच्या हितसंबंधांबाबतचा मुद्दा हा सहजपणे हाताळला जाण्याच्या श्रेणीतील आहे. त्या मुद्दय़ाशी संबंधितांच्या हितसंबंधांबाबत सविस्तर माहिती दिल्यास हा मुद्दा फारसा ताणला जाण्याची आवश्यकता नसल्याचे मत ‘बीसीसीआय’ने व्यक्त केले आहे. ‘बीसीसीआय’च्या घटनेतील ३८ (३ अ) कलमानुसार ज्यांना माफ केले जाऊ शकते, असा हा वाद असल्याने त्यानुसार तो सोडवला जाण्यावर ‘बीसीसीआय’ने भर दिला आहे.