भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष जगमोहन दालमिया हे असे एकच प्रशासक होते की त्यांचे क्रिकेट विश्वामध्ये सारेच मित्र होते, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी कर्णधार आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (कॅब) नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुलीने दालमिया यांच्या शोकसभेमध्ये दिली.
२० सप्टेंबरला दालमिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. १९७७ सालापासून दालमिया हे क्रिकेटमध्ये प्रशासक म्हणून कार्यरत होते.
‘‘जेव्हा मी जगभरात जायचो तेव्हा सारेच त्यांच्याविषयी विचारपूस करायचे आणि मला दालमिया यांना त्यांचा संदेश पोचवायला सांगायचे. विश्वाच्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे मित्र, शुभचिंतक भेटायचे. दालमिया हे प्रत्येक वेळी अध्यक्ष नसायचे. पण न्यूझीलंड असो किंवा इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, पाकिस्तान कुठेही मी गेलो तर भेटलेल्या व्यक्ती आपला नमस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवायला सांगायचे,’’ असे गांगुली दालमिया यांच्या शोकसभेत बोलत होता.
दालमिया यांची शोकसभा इडन गार्डन्सवर घेण्यात आली होती. या वेळी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, बीसीसीआयचे संयुक्त सचिव अमिताभ चौधरी, कॅबचे अधिकारी, वरिष्ठ सदस्य आणि दालमिया यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.