क्रिकेटच्या मैदानावर दादागिरी गाजवल्यावर आता क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालमध्ये (कॅब) आपली चुणूक दाखवण्यासाठी भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली सज्ज झाला आहे. जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर ‘कॅब’च्या अध्यक्षपदी गांगुलीची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर जगमोहन यांचा पुत्र अविषेक दालमियाची कॅबच्या संयुक्त सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॅबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही घोषणा केली. सबीर गांगुली आणि बिस्वरूप डे हे अनुक्रमे संघटनेच्या संयुक्त सचिव आणि खजिनदार या पदावर असतील. कॅबच्या अधिकाऱ्यांनीच हा निर्णय घेतला असून मी फक्त त्याला पाठिंबा दिला आहे.
‘‘दालमिया यांच्या दुर्दैवी निधनानंतर आमच्यावर सर्वत्र शोककळा पसरली आहे, पण कुणी तरी कॅबमधील त्यांच्या पदावर जाऊन क्रिकेटचा विकास करणे गरजेचे आहे. आमच्यासाठी क्रिकेटचे कुटुंब महत्त्वाचे आहे, त्यामध्ये कोणतीही दुरवस्था होऊ नये, असेच आम्हाला वाटते. माझी फक्त एवढीच या साऱ्यांना विनंती आहे की, जग्गूदा यांनी केलेले महान कार्य असेच अविरत सुरू ठेवावे,’’ असे ममता म्हणाल्या.
कॅबचा अध्यक्ष निवडताना मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असतो, असे म्हटले जाते. याबाबत ममता म्हणाल्या की, ‘‘मी विषयामध्ये कोणतीच ढवळाढवळ करत नाही. त्यांनी फक्त चांगले काम करावे, असेच मला वाटते. त्यामुळे हा निर्णय कॅबच्या अधिकाऱ्यांनीच घेतला असून मी फक्त त्याला पाठिंबा दर्शविला आहे.’’
अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर ४३ वर्षीय गांगुली म्हणाला की, ‘‘आयुष्यात नवी आव्हाने येतच असतात. दालमिया यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र अविषेक प्रशासनामध्ये आल्याबद्दल मला आनंद होत असला तरी त्याच्यासाठी हा फार भावुक क्षण असेल. मी, बिस्वरूप, सुबिर यापुढे एकत्रितपणे काम करू, यामध्ये कसलीच समस्या नाही.’’
अविषेकला क्रिकेटच्या प्रशासनाचा काहीच अनुभव नाही. त्याच्यासाठी हे नवीन आव्हान असेल. पण त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्तींना क्रिकेटच्या प्रशासनाचा चांगला अनुभव असून त्याला यांच्याकडून बरेच काही शिकता येईल.