करोनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्व थबकले असताना आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) पुन्हा एकदा जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवण्याची संधी मिळू शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) रिक्त होणाऱ्या कार्याध्यक्षपदाच्या जागेवर आता माजी क्रिकेटपटू आणि ‘बीसीसीआय’चा विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली विराजमान होण्याची शक्यता आहे.

आयसीसीचे विद्यमान कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या जागी गांगुलीची मोर्चेबांधणी करण्यास ‘बीसीसीआय’ने सुरुवात केली आहे. मनोहर यांचा कार्याध्यक्षपदाचा कालावधी जुलै महिन्यात ‘आयसीसी’च्या वार्षिक परिषदेनंतर समाप्त होणार आहे. मनोहर यांची जागा घेण्यास इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचे (ईसीबी) अध्यक्ष कॉलिन ग्रोव्हज उत्सुक आहेत. पण करोनामुळे ‘बीसीसीआय’ला नामी संधी मिळाली आहे. गांगुलीला मते देण्यास कोणती संलग्न मंडळे तयार आहेत, याची चाचपणी ‘बीसीसीआय’कडून केली जात आहे.

गांगुलीला माजी क्रिकेटपटू ग्रॅमी स्मिथ आणि जॅक फॉल या दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पाठिंबा जाहीर केला होता. ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदासाठी सौरव गांगुलीसारखे कणखर नेतृत्व हवे, असे दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिनिधींनी म्हटले होते. मात्र त्यानंतर आपण या पदासाठी कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही, असे दक्षिण आफ्रिका मंडळाने नंतर स्पष्ट केले.

२०१६मध्ये मनोहर हे ‘आयसीसी’चे स्वतंत्र कार्याध्यक्ष म्हणून निवडून आले होते. २०१८मध्ये ते पुन्हा एकदा ‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले होते. ‘आयसीसी’च्या घटनेनुसार तिसऱ्या आणि अंतिम पर्वासाठी ते पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. पण या पदात आता त्यांना फारसे स्वारस्य उरलेले नाही. करोनाचा कहर असाच कायम राहिला तर त्यांना आणखी काही महिन्यांसाठी मुदतवाढ मिळू शकते. मात्र ‘आयसीसी’ मंडळाने अद्याप नामांकन प्रक्रिया जाहीर केलेली नाही.

विद्यमान किंवा याआधीचे आयसीसीचे संचालक असलेले उमेदवार (आयसीसी मंडळाच्या बैठकीत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलेले कुणीही) या पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहू शकतात. गांगुलीने मार्च महिन्यात व्हिडियो कॉन्फरसिंगद्वारे पहिल्यांदा आयसीसी मंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला होता. निवडणुकीत उभे राहण्यासाठी उमेदवाराला दोन किंवा अधिक देशांचा पाठिंबा असायला हवा.

गांगुलीचा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ फक्त नऊ महिन्यांपुरता असून जुलै महिन्यात संपुष्टात येणार आहे. बीसीसीआयच्या घटनेनुसार त्याला पुढील तीन वर्षे देशातील कोणत्याही प्रशासकीय पदावर काम करता येणार नाही. आपला हा कार्यकाळ वाढवण्यासाठी बीसीसीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण त्यावर कोणताही निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला नाही. त्यामुळे गांगुलीचे पद रिक्त झाल्यास, त्याला जागतिक क्रिकेटमधील उच्च पदावर जाण्याची संधी आहे.